

Municipal Corporation will build flats for sanitation workers: Commissioner G. Srikanth
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहराच्या स्वच्छतेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सफाई कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकेकडून ठोस पावले उचलली जाणार आहेत. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि. २७) किलेअर्क भागातील नौबत दरवाजा येथील सारनाथ सोसायटीतील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पाहणी केली.
यावेळी तेथील दयनीय अवस्था पाहून ते क्षणभर भावूक झाले. पावसाचे पाणी गळणाऱ्या छपराखाली कुटुंबासह रा-हणारे कर्मचारी, भिंतींवर उमटलेले ओलसरपणाचे डाग, अरुंद खोल्यांत वाढलेली घुसमट पाहुण ते खिन्न झाले.
किलेअर्क भागात सारनाथ सोसायटीत महापालिकेतील काही सफाई कर्मचाऱ्यांची निवस्थाने आहेत, सुमारे साडेसतरा हजार स्क्वेअर फूट जागेत अनेक कर्माचार्यांचा संसार थाटलेला आहे. मात्र रस्ता रुंदीकरणात यातील काही भाग बाधित होणार आहे. या भागाची मंगळवारी सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पाहणी केली. यावेळी अंत्यत अरुंद खोल्यांमध्ये कर्माचारी परिवारासह या छोट्याशा जागेत कसे राहातात हे जाणून ते आवाक झाले.
यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी, कुटुंबीयांच्या समस्या ऐकताना आयुक्त श्रीकांत यांच्या चेहऱ्यावरची संवेदना स्पष्ट दिसत होती. दरम्यान, शहराची स्वच्छता, नाली सफाई, पथदिवे दुरुस्ती, पाणीपुरवठा यासारखी कष्टप्रद कामे बजावणारे कर्मचारी मात्र स्वतःच्या मूलभूत सोयीपासून वंचित असल्याचे वास्तव त्यांनी स्वतः च्या डोळ्यांनी पाहिले. जे कर्मचारी शहर सुस्थितीत ठेवण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी योग्य घरांची सोय करण्याची त्यांची तळमळ यावेळी दिसून आली. तसेच तुम्ही ज्या जागेत राहतात, त्या जागेवर विकासकाकडून नवीन सुसज्ज सदनिका उभारण्याचा निर्णय आयुक्त जी. श्रीकांत यांनी बोलून दाखवला.
यात किमान आवश्यक सुविधा, सुरक्षित इमारत रचना व आरोग्यपूर्ण वातावरण उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न फक्त सोयीचा नाही तर त्यांच्या सन्मानाचा आहे, असेही यावेळी आयुक्तांनी सांगितले. स्वच्छता कामगार असो वा अन्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शहराच्या उभारणीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांना योग्य घर मिळाले तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल, यावर त्यांनी भर दिला. यावेळी उपायुक्त नंदकिशोर भोंबे, संजय रगडे, संजय सुरडकर, यांच्यासह विनोद रगडे, फकिरा खरात, संतोष खरात, गंगाधर थोरात, प्रकाश रगडे, दिलीप सुरडकर, गणेश हिवराळे, अर्जुन शिंदे, राजू मिसाळ, प्रकाश सुरडकर यांच्यासह शेकडो महिला आणि नागरिकांची उपस्थिती होती.
कर्मचाऱ्यांनीही आयुक्तांच्या या संवेदनशील भूमिकेचे स्वागत केले. अनेक जणांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या प्रश्नावर अखेर तोडगा निघणार, याबाबतचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नवसंजीवनी मिळणार असून, त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थान प्रकाश पडणार असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला.