

Municipal Corporation issues only notices to dangerous buildings
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: पावसाळा अर्ध्यावर आला तरी शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींवर महापालिकेकडून अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. शहरभर सुमारे ८० इमारती जीर्ण व मोडकळीस आल्या आहेत. या इमारत मालकांना केवळ नोटीस बजावून प्रशासन थांबले असून, एकाही इमारतीचे पाडकाम झालेले नाही. त्यामुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटनेचा धोका कायम असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महापालिकेच्या नोंदीनुसार शहरातील अनेक इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. विशेषतः जुन्या शहरातील दाट लोकवस्ती आणि व्यापारी भागात अशा इमारतींचे प्रमाण अधिक आहे. या भागातून दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे एखादी इमारत कोसळल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मान्सूनपूर्व काळात धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांच्यावर पाडकामाची कारवाई अपेक्षित होती. मात्र संबंधित इमारत मालकांना नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे धोकादायक इमारती हटविण्याची मोहीम केवळ कागदोपत्रीच राहिल्याची टीका होत आहे.
महापालिकेने धोकादायक इमारतींवरील कारवाईची जबाबदारी संबंधित झोन कार्यालयांकडे सोपविली आहे. सर्व झोन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी शहरात एकाही ठिकाणी प्रत्यक्ष पाडकाम सुरू झालेले नाही. त्यामुळे आदेशांची अंमलबजावणी नेमकी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जुन्या शहरातील भाग धोक्यात
सराफा बाजार, मुलूमची बाजार, शहागंज, चौराहा, टिळकपथ, गुलमंडी, नाझ गल्ली, नगरखाना गल्ली, केळीबाजार, खाराकुंवा, दलालवाडी, भांडीबाजार, सुपारी हनुमान रोड तसेच बारूदगर नाला परिसरात धोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे. दाट लोकवस्ती आणि शहराच्या मुख्य बाजारपेठमुळे या भागात कोणतीही दुर्घटना गंभीर ठरू शकते.