

छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पार्टी महापालिकेची निवडणूक शिवसेनेसोबत युतीत लढणार आहे. येत्या दोन दिवसांत जागा वाटप पूर्ण होऊन उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. सध्या अनेकांनी उमेदवारी अर्ज घेतले, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, अध्यक्षांना विचारूनच ते भरावेत. बंडखोरी करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका, पक्षाकडे केंद्र आणि राज्यात सुमारे ९०० समिती असून, त्यावर प्रत्येकाचा विचार होईल, असे चॉकलेट देत ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी संभाव्य बंडोबांना शांत करण्याचा प्रयत्न गुरुवारी (दि. २५) पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केला.
यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, शहराध्यक्ष किशोर शितोळे, निवडणूक प्रमुख समीर राजूरकर, माजी महापौर भगवान घडमोडे, अनिल मकरिये, बसवराज मंगरुळे, प्रशांत देसरडा, शालिनी बुंदे, कचरू घोडके आदी उपस्थित होते.
कार्यालयाच्या उद्घाटनानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे जालना रोडवरील तापडिया कासलीवाल मैदानावर उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इच्छुकांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री सावे यांनी शिवसेनेसोबत भाजपची युती होणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, येत्या या दोन दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर होतील. युतीमुळे अनेकांची निवडणूक लढण्याची संधी हुकेल. परंतु त्यामुळे बंडखोरीचा प्रयत्न करू नका. निवडणुकीत प्रत्येकालाच संधी मिळत नसते, असे सांगत त्यांनी उमेदवारी अर्ज ज्यांनी घेतले त्यासर्वांनी शहर जिल्हाध्यक्ष शितोळे यांना विचारूनच उमेदवारी अर्ज दाखल करावा, असे सांगितले.
एबी फॉम माझ्याकडे आले...
महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून 1 उमेदवारांसाठी अधिकृत एबी फॉम प्राप्त झाले आहेत. उमेदवार निश्चित झाल्यानंतर शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्याकडे ते देण्यात येतील. ज्यांना एबी फॉम मिळेल. त्यांनीच उमेदवारी भरावी, असेही मंत्री अतुल सावे म्हणाले.
सोशल मीडियावर कमळ ठेवा
प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपापले सोशल मीडिया अकाऊंट तयार केले आहे, परंतु त्यावर उमेदवारांचेच फोटो दिसत आहेत. तसे न करता प्रत्येकाने आपली निशाणी कमळ हेच अकाऊंटवर ठेवावे, असे आदेश मंत्री अतुल सावे यांनी दिले.