

चंद्रपूर : बीएसएनएल कंपनीच्या कॉपर केबल चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत दोन आरोपींना अटक करून एकूण रूपये ४४,४८,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी स्वतःला कंत्राटी कामगार म्हणून दाखवून हेलमेट, रिफ्लेक्टर, जॉकेट यांचा वापर करून चोरी केली होती.
काल ८ सप्टेंबर २०२५ रोजी बीएसएनएल कंपनीचे कनिष्ठ अभियंता अभिजीत अशोक जिवणे (वय ४५) रा. नगीनाबाग, चंद्रपूर यांनी, कंपनीचे कॉपर केबल किंमत अंदाजे ₹२४,००,००० चोरी गेल्याची पोलीस ठाणे रामनगर येथे तक्रार नोंदविली होती. त्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक व सखोल तपास सुरू केला. गोपनिय माहितीच्या आधारे एक आयशर ट्रक क्रमांक युपी-२४-बीटी-७०४६ कोसारा रोडवर लपविल्याचे समजले. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपी नरेंद्र सोरनसिंह मौर्या (वय २२) रा. उधैनी) आणि नाजीम शोख असमुद्दीन शेख (वय २६) रा. कलपीया, उत्तरप्रदेश यांना अटक केली.
त्यांच्याकडे तपास करताना चोरीस गेलेले कॉपर केबल किंमत ₹२४,००,०००, तसेच वाहन, हेलमेट, रिफ्लेक्टर, जॉकेट, प्लॉस्टिक बॅरिकेड यांसह एकूण ₹ ४४,४८,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी दुरुस्तीच्या कामाच्या नावाखाली स्वतःला कंत्राटी कामगार असल्याचे भासवून वायर चोरी केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात, सपोनि दिपक कॉक्रेडवार व अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी केली.