

छत्रपती संभाजीनगर : कामानिमित्त शहराबाहेर किंवा शहरात असणारे चाकरमाने दिवाळीत आपापल्या गावी जातात. यादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने विविध मार्गांवर जादा बससेवा देण्याचे नियोजन केले आहे. या काळात छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच आगारांतून १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत सुमारे ३२ जादा बस सेवा देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.
शाळेतील परीक्षांचा बुधवार (दि. १५) हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बाहेगावी जाण्यासाठी आजपासूनच विविध मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. दिवाळीनिमित्त तर यात मोठ्या प्रमाणात वाढ होते. ही बाब आजपासून दिवाळीनिमित्त जादा बससेवा लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या आणि गर्दी असलेल्या मार्गावर बुधवारपासून जादा बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच आगारांतून ही सेवा देण्यात येणार आहे. यात नागपूर, अकोला, लातूर, पुणे, बुलढाणा, जळगाव, भुसावळ, नाशिक, धुळे, शिर्डी, आदी मार्गांचा समावेश आहे.
चिंचवड मार्गावर विशेष सुविधा
चिंचवड येथील विविध कंपन्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील तरुण मोठ्या प्रमाणात नोकरी करत आहेत. त्यांच्या सुविधेसाठी १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान २० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. यात कमी किंवा परस्थितीनुसार वाढही होण्याची शक्यता आहे. या २० बस नियमित बसच्या व्यतिरिक्त सेवा देण्यासाठी तयार ठेवण्यात आल्याचीही माहिती घाणे यांनी दिली.
१४ हजार किलोमीटरपेक्षा जास्त सेवा
दिवाळीनिमित्त धावणाऱ्या या बसना कोणत्या आगारांतून कोणत्या मार्गावर सोडायाचे आणि त्या बसने किती किलोमीटर अंतरापर्यंत सेवा द्यायची याचे नियोजन करण्यात आले आहे. या ३२ बस दिवाळीदरम्यान सुमारे १४ हजार ५३८ किलोमीटरच्या अंतरापर्यंत प्रवाशांना सेवा देणार आहेत.