

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या मुगाच्या बाजार लिलावात मंगळवारी (दि.२६) सकाळी ९ हजार रुपये क्विटल विकणारे मूग दुपारच्या लिलावात चक्क तीन ते चार हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी समितीचे सचिव यांना घेराव घालत भाववाढ करण्याची मागणी केली. यावेळी एकच गोंधळ उडाला होता.
अखेर समितीच्या सचिवांनी इतर तालुक्यात फोन करून बाजार भावाची माहिती घेऊन संतप्त शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर तब्बल पाच तासांनंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतरही घटनास्थळी ना सभापती, ना संचालक मंडळाचे कोणते संचालक बाजारात न फिरकल्याने शेतकरीवर्गातून संताप व्यक्त करण्यात आला.
तब्बल चार वर्षांच्या दीर्घ काळानंतर प्रथमच तालुक्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना मूग पीक हाती आले आहे. यामुळे मूग मोठ्या प्रमाणात शेतकरी विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत. मंगळवारी येथील बाजार समितीत मुगाची विक्रमी आवक झाली. सकाळी दहा वाजेदरम्यान व्यापाऱ्यांनी लिलाव चालू केला. यावेळी मुगाला तब्बल ९ हजार रुपये क्विटल पर्यंतचा भाव मिळाला. परंतु दुपारच्या लिलावात भावात चक्क तीन ते चार हजार रूपयांची घसरण झाल्याचे उपस्थित शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने. संतप्त शेतकऱ्यांनी या प्रकारास विरोध करून व्यापाऱ्यांसोबत राडा घातला. यामुळे तब्बल पाच तास हे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. दुपारच्या लिलावात मुगाला चार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाल्याने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मुगाचे लिलाव करून दिला नाही. तब्बल पाच तास लिलाव बंद पडल्याने बाजार समितीचे सचिव प्रलाद मोटे बाजार समितीमध्ये येवून व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त शेतकरी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे सचिव मोटे यांनी निफाड, कोपरगाव, येवला व लासुरस्टेशनचे बाजार भाव जाणून घेतल्यानंतर सचिव यांनी शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा करून योग्य भाव देण्याच्या अटीवर व्यापाऱ्यांना लिलाव करण्यास सांगितले. चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा पाच वाजता लिलाव सुरु केला.
लिलाव बंद पडल्यानंतर तब्बल पाचतास व्यापारी व शेतकऱ्यांन मध्ये भावावरुन राडा सुरु होता. यामुळे काही शेतकऱ्यांनी वेतागुण मिळेल त्या भावाला समाधान मानन्याची तैयारी दाखवली तर काही शेतकऱ्यांनी हमी भावा पेक्षा कमी दराने मूंगाची विक्री होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला विशेष म्हणजे दिवसभर सुरु असलेल्या राडा तरी एकही संचालक बाजारात फड़कले नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करत संचालक मंडळ गेले कुठे ? अशी विचारना करताना दिसले.