

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने जिल्ह्यात लगेचच आचारसंहिता लागू झाली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (दि.१४) निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, डॉ. सुचेता शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकाई आश्विनी लाठकर, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी विद्याधर शेळके आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी निवडणूक यंत्रणा, मनुष्यबळ उपलब्धता, मतदान यंत्रे उपलब्धता जिल्हा पातळीवर स्थापित करावयाचे कक्ष, तालुका पातळीवर स्थापित करावयाचे कक्ष, प्रतिबंधात्मक कारवाई, कायदा सुव्यवस्था इत्यादीबाबत आढावा घेतला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
संबंधित क्षेत्रात ही आचारसंहिता लागू झाली असली तरी अन्य ठिकाणीही संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. जिल्ह्यात एकूण १८ लक्ष ७३ हजार ०५३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये ९ लाख ७९ हजार २३४ पुरुष आणि ८ लाख ९३ हजर ७७८ स्त्री, तर ४१ इतर मतदारांचा समावेश आहे.
दोन मते देणे अपेक्षित
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या गणासाठी द्यावे लागणार आहे. त्यामुळे एका मतदाराने दोन मते देणे अपेक्षित असते.
तालुकानिहाय मतदार संख्या
सोयगाव- ८७७४७
सिल्लोड- २४८८७४
कन्नड -२५८०८०
फुलंब्री- १२७८२३
खुलताबाद -८५३०७
वैजापूर- २२३९४७
गंगापूर- २९७७६४
छत्रपती संभाजीनगर- २९५७६६
पैठण - २४७७४५