

छत्रपती संभाजीनगर: नामांतरासाठी सलग १७ वर्षे लढा दिल्यानंतर ३१ वर्षांपूर्वी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला. नामविस्तार दिन साजरा करण्यासाठी बुधवारी (दि.१४) हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी विद्यापीठ गेट येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावून उभे होते.
यावेळी लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध उपासक-उपासिका गेटवर उपस्थित होते. अनेकांनी गेटजवळची माती आपल्या भाळी लावून शहिदांना आदरांजली वाहिली.
नामविस्तार दिनाचे ३२ वे वर्ष असल्याने येथे विविध पक्ष संघटनांच्या प्रमुखांसह सकाळपासूनच आबालवृद्धांच्या गेटसमोर अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या. बौद्ध भिक्खू महासंघाच्या वतीने विद्यापीठ गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्धवंदना घेतली. यात बाहेरून आलेल्या व परिसरासह शहरातील उपासकांची उपस्थिती होती.
यानंतर सकाळी १० वाजेदरम्यान समता सैनिक दलाच्या जवानांनी बाबासाहेबांसह शहिदांना मानवंदना देत अभिवादन केले. १० वाजेनंतर शहरातील विविध पक्ष-संघटना व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिवादनासाठी एकच गर्दी केली होती.
अन्नदानाची परंपरा जपली
बौद्ध धम्मातील दान पारमितेचे महत्त्व लक्षात घेऊन विविध संस्था-संघटनांच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिरे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील आधारित विविध लेखकांची पुस्तके व बाबासाहेबांचे हस्ताक्षर, प्रतिमा असलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या. कार्यक्रमादरम्यान पुस्तके व बाबासाहेबांची प्रतिमा असलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्री होतात ही बाब लक्षात घेऊन अनेक व्यावसायिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकाने थाटली होती.
क्षणचित्रे
नामांतर शहीद स्मारकाजवळ सेल्फीसाठी रांगा
अबालवृद्धांसह तरुणाचे शिस्तीत अभिवादन
रक्तदान शिबिराला तरुणांचा मोठा प्रतिसाद
शहीद स्मारक परिसर पाहण्यासाठी मोठी गर्दी
भीमगीतांच्या माध्यमातून स्वरमयी अभिवादन
पाणी, बिस्किटांचे मोफत वाटप
भीमा तुझ्या जन्मामुळे
विद्यापीठ गेट परिसरात मराठवाड्याच्या विविध भागांतून आलेल्या गायकांनी उपासक-उपसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी भीमा तुझ्या जन्मामुळेः, तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हायः यासारख्या गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. युवकांच्या घोषणांतून बाबासाहेबांप्रती असलेला आदरभाव प्रकषनि दिसून आला.