

Midnight robbery in Tandulwadi Shivara, five people seriously injured
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांदुळवाडी शिव-ारात सोमवारी पहाटे २ वाजता ७ ते ८ मुखवटेधारी चोरट्यांनी घरात घुसून थरकाप उडवणारा दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी घरातील वृद्ध महिलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांना बेदम मारहाण करत चार ते पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चार हजार रुपये रोख रक्कम लुटून पलायन केले. चोरट्यांच्या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
जनार्दन कारभारी राशिनकर (७०), पोपट जनार्दन राशिनकर (३५) , मनीषा पोपट राशिनकर (२७), हिराबाई जनार्दन राशिनकर (५०) अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी मध्यरात्री राशिनकर कुटुंब साखर झोपेत असताना ७ ते ८ मुखवटेधारी चोरट्यांनी घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबातील सदस्यांना याची कुणकुण लागली त्यांचा त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता.
चोरट्यांनी त्यांच्यावर कु-हाड आणि काठीने जोरदार हल्ला करत गंभीर जखमी केले. घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. रात्री दोन ते तीन वाजता राशिनकर यांच्या घराकडून आक्रोशाचा आवाज येत असल्याचे उपसरपंच दत्तू राशिनकर यांच्या पुतण्याला विनायक नानासाहेब राशिनकर यांना ऐकू आले. त्यांनी तत्काळ दत्तू राशिनकर, मोहन राशिनकर आणि बाबासाहेब राशिनकर यांना बोलावले.
त्यानंतर दत्तू राशिनकर मोटारसायकल सुरू करून विनायक आणि तुषार राशिनकर यांच्यासह घटनास्थळी गेले असता कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी अवस्थेत दिसले. चोरट्यांनी घरातील एका महिलेला कुन्हाडीने मारहाण केली, तर इतरांवर लाकडी दांड्यांनी प्राणांतिक हल्ला केला. जवळपास दीड ते दोन तास चोरट्यांनी घरातच थैमान घालत लूटमार केली.
सर्व जखमींना सिद्धनाथ वाडगाव उपकेंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे उपचार न मिळाल्याने त्यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात सकाळी साडेआठ वाजता रवाना करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिस पहाटे घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. परंतु या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करत आहे. ही घटना दरोडा की काही वैयक्तिक वादाचा परिणाम, याबाबत ग्रामीण भागात विविध चर्चांना उधाण आले आहे.
धाडसी हल्ल्यानंतर भीतीचे वातावरण
एका कुटुंबावर धाडसी हल्ल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण; पोलिसांकडून तत्काळ कारवाईची मागणी केली. या धाडसी हल्ल्यानंतर तांदुळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.