

Municipal school students watched rocket launch
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरुवनंतपुरम (केरळ) येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीए-सएससी), थुंबा येथे सोमवारी (दि.१७) प्रत्यक्ष रॉकेट प्रक्षेपणाचा थरार पाहिला. यासोबतच अवकाश संशोधनाची रोमांचक सफर अनुभवली.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्टुडन्ट परीक्षातील टॉप टेन विद्यार्थ्यांना इस्त्रो भेटीची अनोखी संधी मिळाली. दरम्यान बालदिनाच्या दिवशी १४ नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्तांनी विद्यार्थ्यांना विमानाने केरळला रवाना केले. बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रथमच विमानप्रवास केला.
व्हीएसएससी येथे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रॉकेट प्रक्षेपणाचा थरार पाहिला. तसेच चंद्रयान-३, आर्यभट्ट, रोहिणी-२००, विविध उपग्रहांच्या प्रतिकृती, तसेच आधी प्रक्षेपित करण्यात आलेल्या रॉकेटचे मॉडेल्स त्यांनी पाहिले. भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मानव मोहिमेची प्रतिकृतीदेखील इस्टोच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दाखवली. विद्यार्थ्यांची जिज्ञासा पाहून इस्त्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.
मनपा शाळेतील विद्यार्थी इतक्या लांब कसे पोहोचले, अशी उत्सुकता व्यक्त करताच, स्मार्ट स्टुडन्ट परीक्षेबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आयुक्त जी. श्रीकांत यांना रॉकेटची प्रतिकृती विशेष भेट म्हणून विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केली. मनपाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांना इस्त्रो भेटीची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या विद्यार्थ्यांमध्ये प्रा. शाळा नारेगाव, सिडको एन-७, हसूल, इंदिरानगर बायजीपुरा, विटखेडा व मिटमिटा शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी मंगळवारी (दि. १८) सायंकाळी विमानाने छत्रपती संभाजीनगरात परतणार आहेत. त्यासोबत उपआयुक्त व शिक्षण विभागप्रमुख अंकुश पांढरे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांच्यासह किरण तबडे, मंगेश जाधव, उमा पाटील व सविता बांबर्डे आदींची उपस्थिती होती.