

Chhatrapati Sambhajinagar Clashes
छत्रपती संभाजीनगर: शहरातील चंपा चौक परिसरात शुक्रवारी मध्यरात्री क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, त्याचे रूपांतर चाकू हल्ल्यात झाले. या घटनेनंतर शेकडोंच्या संतप्त जमावाने जिन्सी पोलीस ठाण्याला वेढा घातल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या चाकू हल्ल्यात सलमान खान, युसूफ खान यांच्यासह अन्य एकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री चंपा चौक भागातील कापड गिरणी मैदानात मित्रांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत आणि नंतर थेट चाकू हल्ल्यात झाले. दोन्ही गटांनी परस्परांवर चाकूने हल्ला केल्याने काही तरुण जखमी झाले. एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाला चाकू लागल्याने त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. एका गटाने दोन तरुणांना मारहाण करत थेट जिन्सी पोलीस ठाण्यात आणले, तर जखमी तरुणांचे समर्थकही ठाण्यात जमले. यामुळे शेकडोंच्या जमावाने पोलीस ठाण्याला वेढा घातला. ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना, जमावातील काही जणांनी एका पोलीस अधिकाऱ्याशी उद्धट वर्तन करत शिवीगाळ केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. जमाव हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. जवळपास तासभर पोलीस ठाण्यात हा गोंधळ सुरू होता. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र पोलीस अधिक तपास करत आहेत.
जिन्सी पोलीस ठाण्याचा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. असे असताना मध्यरात्री शेकडोंचा जमाव ठाण्यात घुसून गोंधळ घालत होता. एका पोलीस अधिकाऱ्याला जमावाने दम भरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, हा सर्व गोंधळ सुरू असताना पोलीस ठाण्यातील एकही वरिष्ठ अधिकारी रात्री एक वाजेपर्यंत घटनास्थळी फिरकला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
या घटनेमुळे शहरातील तणावाच्या मालिकेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. दोन दिवसांपूर्वीच सिटी चौक परिसरात दोन गटांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर आता जिन्सी भागात पुन्हा दोन गट आमनेसामने आल्याने शहरात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.