

MIDC supplies potable water to 7 villages in the Waluj area via 44 tankers
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज महानगर परिसरात पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले असून, ८ गावांना एकूण ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तापमानामुळे वाढत्या जलसाठ्यांमध्ये कमालीची घट झाल्याने विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळी खालावली आहे.
यात प्रामुख्याने ७गावांना ४४ टँकरद्वारे एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये वडगाव कोल्हाटी २४, तिसगाव ७, साजापूर व पंढरपूर प्रत्येकी ३, जांभळा १, तर जोगेश्वरी व कमळापूर या गावांना प्रत्येकी ३ टँकरचा समावेश आहे. उर्वरित गावांना ३५ टँकरद्वारे खासगी विहिरींवरून पाणी दिले जात असून, गंगापूर तालुक्यात १९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
तिसगावात टँकर वाढवण्याची मागणी
औद्योगिक क्षेत्रामुळे तिसगावची लोकसंख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. मात्र येथे केवळ ७टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या लंकाबाई जाधव व ग्रामस्थांनी केली आहे.
चारा टंचाईचे वाढले संकट
पाणीटंचाईसोबतच शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिल्लक चारा संपत आल्याने शेतकऱ्यांना चढ्या भावाने चारा खरेदी करावा लागत असून, पावसाने ओढ दिल्यास जनावरांना कसे जगवायचे, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.