

MHT CET Begins; 8,000 Students Appear for the Exam
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षद्वारे (सीईटी सेल) शनिवारपासून एमएचटी-सीईटी पीसीएम समूहाच्या प्रवेश परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी मराठवाड्यात दोन सत्रांत ८ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक २९०७विद्यार्थ्यांचा समावेश होता. भौतिकशास्त्रातील अनेक प्रश्न काहींना कठीण वाटले.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभियांत्रिकी, औषधनिर्माण व कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. यात अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या पीसीएम समूहाच्या प्रवेश परीक्षेला शनिवारपासून सुरुवात झाली. ११ ते २० एप्रिल दरम्यान ही परीक्षा होणार आहे.
राज्यभरात पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीसाठी राज्यात ४ लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील २०१ परीक्षा केंद्रावरून परीक्षा घेण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सात परीक्षा केंद्र आहेत. दररोज दोन टप्प्यांत परीक्षा घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशी दोन्ही सत्रांत मिळून राज्यात ५९ हजार ७२४ विद्यार्थ्यांपैकी ५७ हजार २९० विद्यार्थ्यांची परीक्षेला उपस्थिती होती. मराठवाड्यात आठ जिल्ह्यांतून परीक्षा होत आहे. पहिल्या दिवशी ९ हजार २९९ पैकी ८९०५ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
काही विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्रातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक असल्याचे सांगितले. काही प्रश्न विस्तृत, आव्हानात्मक होते, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. तर रसायनशास्त्रातील प्रश्न थेरॉटीकल अधिक होते. तर गणितातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम होती. त्यामुळे गणित, रसायनशास्त्रातील प्रश्न भौतिकशास्त्राच्या तुलनेत सोपे होते असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.