

Mega final round of ITI admissions starts Sunday
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथील प्रवेश प्रक्रियेला यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चौथ्या फेरीअखेर संस्थेच्या एकूण १,०८० प्रवेशक्षमते पैकी ९०८ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. आतापर्यंत ८४.०७ टक्के जागांवरील प्रवेश पूर्ण झाले. आता १७२ जागाच रिक्त असून, त्यासाठी ९ आगस्टपासून महाअंतिम फेरी सुरू होईल.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, टूल अँड डाय मेकर या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमात ९७.५० टक्के, मेकॅनिक मोटार व्हेईकलमध्ये ९५.८३ टक्के, तर टूल अँड डाय मेकरमध्ये ९३.०६ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. ड्युअल सिस्टिम प्रशिक्षणातील अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वायरमन ट्रेडमध्ये सर्व २० जागा भरून १०० टक्के प्रवेश पूर्ण झाले. तसेच इलेक्ट्रिशियन, फिटर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (ड्युअल सिस्टिम) या अभ्यासक्रमांमध्येही ९५ टक्क्यांहून अधिक जागा भरल्या आहेत. वुडवर्क टेक्निशियनमध्ये ४५.८३ टक्के प्रवेश झाले असून, मशीनिस्ट ग्राइंडर, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि आयसीटी सिस्टिम मेंटेनन्स या अभ्यासक्रमांमध्येही अनेक जागा रिक्त आहेत.
१७२ जागांसाठी ११ ला मेरिट लिस्ट
आता रिक्त १७२ जागांसाठी ट्रेडमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये संधी आहे. शेवटची स्पॉट प्रवेश फेरीची प्रक्रिया ९ तारखेपासून सुरू होत आहे. ११ तारखेला मेरिट लिस्ट लागणार असून, १२ ला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश घेता येईल.