

Married woman set on fire and murdered: Husband, mother-in-law, father-in-law, sentenced to 10 years of hard labor
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करून विवाहितेला पेटवून देत निघृण हत्या करण्यात आली. २०१५ मध्ये घडलेल्या या घटनेत तब्बल १० वर्षांनी न्याय मिळाला. प्रकरणात हुंड्यासाठी विवाहितेची हत्या करणाऱ्या पती, सासू-सासऱ्यासह दीर यांना १० वर्षे सक्तमजुरीसह प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी शुक्रवारी (दि.१८) ठोठावली.
पती वसीमखाँ रसुलखाँ पठाण, रसुलखाँ गुलाब खाँ पठाण, शकील बी रसुलखॉ पठाण व इम्रान खाँ रसुलखाँ पठाण (सर्व रा. आंबेडकर चौक, सिल्लोड) अशी आरोपींची नावे आहेत. मृत फरीन बेगम हिचे काका शेख शबाबुद्दीन हबीबुद्दीन (रा. करंजखेडा, ता. कन्नड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फरीन बेगम हिचे ६ एप्रिल २०१४ रोजी सिल्लोड येथील वसीम खाँ याच्याशी लग्न झाले होते.
विवाहानंतर सासरचे लोक, तू आम्हाला पसंत नाही, तुझ्यापेक्षा आम्हाला चांगली मुलगी मिळाली असती, तुझे माहेरचे लोक भिकारी आहेत, असे टोमणे मारत होते. त्यातच पतीच्या नोकरीसाठी माहेराहून पाच लाख रुपये आण, अशी वारंवार मागणी सुरू होती. पैसे न आणल्यास काडीमोड देण्याची किंवा ठार मारण्याची धमकी दिली जात होती. ही बाब फरीनने वेळोवेळी माहेरी सांगितली.
२१ जुलै २०१५ रोजी सकाळी सुमारे साडेअकरा वाजता सासरे रसूलखान पठाण यांनी तिचे हात पकडले. नणंद आसमा हिने दोन्ही पाय पकडले. पती वसीम, सासू शकिला, दीर इमरान आणि दुसरी नणंद नफिसा पठाणने तिच्यावर रॉकेल ओतले आणि पेटवून दिले, अशी माहिती तिने रुग्णालयात असताना काकांना सांगितली. उपचार सुरू असताना तिचा त्याच दिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. प्रकरणात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक एस. जी. गाढे यांनी न्यायालयात दोष- ारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनीलकुमार बर्वे आणि सूर्यकांत सोनटक्के यांनी १६ साक्षीदार तपासले. सुनावणीअंती न्यायालयाने वरील चौघा आरोपींना दोषी ठरवून भादंवि कलम ३०४ (ब) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी आणि कलम ४९८ (अ) अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार वर्षा कबाडे यांनी काम पाहिले.