

Marathwada Graduate Constituency Election: After the UBT faction, the Sharad Pawar faction also fields a candidate np88
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रंगत वाढली. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप घुगे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रतापसिंह पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांच्याविरोधात भाजपकडून बंडखोरीत करीत एम. के. देशमुख यांनी आपली उमेदवारी दाखल केला. त्यामुळे कालपर्यंत एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता चांगलीच अटीतटीची होऊ शकते. परंतु, अर्ज माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
मराठवाडा पदवीधर मतदार संघात मागील तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण हेच बाजी मारत आहेत. यंदा भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांच्या महायुतीची राज्यात सत्ता आहेत. महायुतीत ठरल्याप्रमाणे मराठवाडा पदवीधर मतदार संघ विद्यमान आमदार असलेल्या राष्ट्रवादीला सोडण्यात आला आहे.
त्यानुसार महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांची उमेदवारी दाखल करताना महायुतीचे शहरातील दोन्ही मंत्री आणि आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीतील भाजपचे इच्छुक मधुकर किसनराव देशमुख (एम.के.) यांनी बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत भाजपचे काही कार्यकर्ते पक्षाचे चिन्ह लावून सहभागी झाले होते.
दरम्यान, महायुतीत बंडखोरी झाली असली तरी महाआघाडीत थेट बिघाडी झाल्याचे चित्र शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावरून दिसून आले. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाकडून दिलीप घुगे यांनी महाआघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबतच आमदार अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते, असे असताना शेवटच्या दिवशी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) धाराशिवचे प्रतापसिंह पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत माजी मंत्री राजेश टोपे, फौजीया खान, संजय वाघचौरे, मेहबुब पठाण, ख्वाजा शरफुद्दीन, काँग्रेसचे जगन्नाथ काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारी अर्जामुळे महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत मिळत असून आता कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले आहे.
६२ उमेदवारांचे ९२ अर्ज
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी अनेकांनी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्तालयात गर्दी केली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करणे सुरूच होते. कालपर्यंत २९ उमेदवारांनी ४१ अर्ज दाखल केले होते. तर शेवटच्या दिवशी मंगळवारी ३३ इच्छुक उमेदवारांनी ५१ अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवसापर्यंत ६२ जणांचे ९२ अर्ज दाखल झाले होते.
आज छाननी, शुक्रवारी माघारी
मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची आज छाननी होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाणार आहे. त्यानंतर शुक्रवार ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहणार, यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
एक उमेदवार तिरडीवर...
एका अपक्षा उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रेतयात्रा काढीत स्वतः तिरडीवर झोपून विभागीय आयुक्तालयाकडे निघाले होते. परंतु, त्या उमेदवाराला पोलिसांनी अण्णा भाऊ साठे चौकातच अडविले.