

Manoj Jarange Patil
छत्रपती संभाजीनगर: जीवाची बाजी लावून मराठ्यांनी लढाई जिंकली आणि यश पदरात पाडून घेतले आहे. सगळे परफेक्ट आहे. जर काही झालच तर सुधारित अध्यादेश काढायला लावू. काहींना जीआर निघाला यात आनंद नाही. त्यांना मुंबईत कुटाकुटी झाली पाहिजे होती. मराठ्यांनो शत्रूच्या टोळीतील कीडे-मकोड्यांच ऐकू नका, मराठे नियमातच आहेत, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. आज (दि. ३) छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी ते बोलत होते.
"पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सगळे मराठे आरक्षणात जाणार. कुणीही शंका बाळगू नये. एक साधी ओळ मराठ्यांच्या हिताची सरकारने लिहिली नव्हती. एखाद्या विदूषक आणि अविचारी माणसावर विश्वास ठेवून संयम ढळू देऊ नका. मी एकटा निर्णय घेत नाही माझी ७ करोड जनता आणि मी मिळून निर्णय घेतो. काही लोकांचं पोट दुखत आहे. त्यांना राजकारण करायचं होत ते कधीच मराठ्यांच्या बाजूने बोललेले नाहीत. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी गॅझेट आहे. ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी तिघांची समिती नेमली आहे. मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे यासाठी समिती आहे. मी तुमच्या पासून दूर गेलो तर वाटूळ होईल आणि त्यांना हेच पाहिजे आहे," असे मनोज जरांगे म्हणाले.
"जीआरमधील एखाद्या शब्दात त्रुटी असेल, तर लगेच सुधारणा करावी लागेल, असे सरकार म्हणाले. काही घाबरु नका, मराठा समाज आरक्षणात गेला, जे बोलतात त्यांनी काय केले. हा मसुदा नाही जीआर काढला आहे. शिंदे समिती नेमली त्यावेळेस देखील असेच बोलले गेले. नंतर त्यांची तोंड बंद झाली. शिंदे समिती आणि आता काढलेल्या जीआरचा काहीही संबंध नाही. समितीने अहवाल दिला आणि आपण अध्यादेश काढायला लावला, "असेही त्यांनी सांगितले.
"सगळे परफेक्ट आहे. जर काही झालाच तर सुधारित अध्यादेश काढायला लावू. मंचाजवळ अनेक अभ्यासक आणि वकील होते. भूजबळ अभ्यासू आणि मुरब्बी नेते आहेत. आज ते मंत्रिमंडळाची बैठक सोडून गेले, याचा अर्थ आपला जीआर पक्का. याचा अर्थ मराठे आरक्षणात गेले हे १०० टक्के सिद्ध झाले. हा जीआर खोटा असता तर उडाला असता. फालतूक काही अभ्यासक आहेत त्यांचे डोके बिथरले आहे. कितीही याचिका कोर्टात केल्या तरी ते चॅलेंज होऊ शकत नाही. सरकारी नोंदी असतील तर याचिका धुडकावून लावली जाते. मराठवाड्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात कुणबी मराठ्यांची संख्या दाखवली आहे. २ लाख २७ हजार नोंदी आहेत. आता ती ६ लाख झाली आहे. मराठे नियमातच आहेत," असेही जरांगे यांनी ठणकावले.