

छत्रपती संभाजीनगर : जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत करण्यात आला असून, मंगळवारी (दि. २६) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ही गाडी नांदेड येथून सोडण्यात आली. दरम्यान छत्रपती संभाजीनगरात आल्यानंतर या गाडीच्या स्वागतासाठी शहरवासीयांसह कोणताही नेता किंवा कार्यकर्ते उपस्थित नसल्याने गाडी रिकामीच मुंबईकडे धावली.
विस्तारीत वंदे भारत एक्सप्रेस दुपारी २.५७ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. २० बोगींच्या रेल्वेत नांदेडहून काही मोजके निमंत्रित, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, रेल्वे फॅन्स आणि रेल्वे कर्मचारीच प्रवास करत होते. बहुतांश रेल्वे रिकामीच होती. येथील रेल्-वेस्थानकांवर ही गाडी पाच मिनिटे थांबली. या गाडीबाबत प्रवाशांतही कुतुहल नव्हते. त्याच बरोबर शहरवासीयांसह येथील विविध पंक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी याकडे पाठ फिरवल्याने ही रेल्वे येथील काही अधिकाऱ्यांना घेऊन रवाना झाली. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही या रेल्वेत चढले नाही.
वंदे भारतच्या विस्ताराला शहरवासीयांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. वेळेचे कुठलेही नियोजन या गाडीमुळे करता येत नसल्याने ही नाराजी होती. आताही रेल्वेने प्रकाशित केलेल्या निवेदनात ही गाडी मुंबईला १२ वाजता पोहोचणार असल्याची नोंद आहे. दरम्यान ही गाडी नियमित वेळापत्रकानुसार मुंबईला दुपारी २:२५ वाजता पोहोचणार आहे. दमरेच्या या दिशाभुलीमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.