

Maratha Reservation: Jarange calls Uday Samant directly from the press conference
जालना, पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाबाबत पत्रपरिषद सुरू असतानाचा मनोज जरांगे यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला. आपण एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असून, त्यांच्या सांगण्यावरूनच संभाजीनगरात बैठका होत असल्याचे ते म्हणाले.
आम्ही शिंदे साहेबांसाठी खस्ता खातो. त्यानंतर माझ्याच विरोधात आंदोलन करण्यासाठी शिंदेंच्या एका आमदाराच्या कॉलेजवर बैठका होत आहे. मी या नेत्याचे नाव सांगणार नाही. तुम्ही शोधून घ्या. माझ्याविरोधात मोर्चा काढण्यासाठी बैठका सुरू आहे. प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी बैठका आहे.
मराठा आंदोलनावर टीका करणारे तुमच्यासोबत काय करत आहे? असा सवाल जरांगे यांनी सामंतांना विचारला. त्यावर सांमत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रीविखे यांच्याशी चर्चा करतो, असे सांगितले. 'मराठा समाजातील लोकप्रतिनिधींचे प्रमाणपत्र रद्द झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला. सरकारच प्रमाणपत्र देते, रद्द करते, याकडे जरांगे यांनी लक्ष वेधले.
एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने अशा बैठकी होऊ शकत नाही. ते कधीच असे आदेश देणार नाहीत, असे सामंत म्हणाले. त्यावर जरांगे म्हणाले 'माझ्या मुलांचे वाटोळे करू नका. मी तुम्ही आणि शंभुराजे देसाई यांच्यामुळे एकनाथ शिंदेंना मानतो. मला चार नेत्यांचे प्रमाणपत्र वैध करून द्यावे'. त्यानंतर सामंत म्हणाले, यासंबंधीची प्रमाणपत्रे पाठविण्यास सांगितले.