

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्याच्या पार्श्वभूमीवर कुणबी जातीच्या नोंदी असलेली कागदपत्रे शोधण्यासाठी हैदराबादला गेलेले पथक नुकतेच रिकाम्या हाताने परतले आहे. त्यांच्या हाती बाराशे सनदी लागल्या आहेत. मात्र, त्यात कुणबी जातीचा कोणताही उल्लेख आढळून आलेला नाही. त्यामुळे आता धाराशिवचे अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तथ्य संकलन समितीची स्थापना करण्यात आली आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची तातडीची बैठक आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यामुळे आता प्रवेश निर्गम उतारे, सात-बारा व अन्य कागदपत्रांवरील नोंदी तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याच अनुषंगाने तथ्य संकलन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत दोन तहसीलदार आणि दोन अव्वल कारकून मदतीसाठी देण्यात आले आहेत. ही समिती आठही जिल्ह्यांतील दस्तावेज तपासणार आहे. यानंतर मुंबईतील मुख्य समितीला अहवाल पाठविला जाणार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी आठही जिल्ह्यांत होणार आहे. आठही जिल्ह्यांतील दस्तावेज मुंबईतील समितीला पाठवायचा असल्यामुळे येत्या आठ दिवसांत सर्व अभिलेखांची तपासणी पूर्ण होईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली.
पंधरा दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकार्यांचे पथक हैदराबादला नोंदी तपासण्यासाठी गेले होते. या पथकाच्या हाती बाराशे सनदी लागल्या. मात्र, त्यात कुणबी जातीचा उल्लेख नाही. त्यामुळे आता कुणबी जातीचे प्रमाणपत्र शोधण्याचे सरकारसमोर मोठे आव्हान आहे.