

Maratha Kranti Morcha back in the fray for sustainable reservation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला सध्या मिळालेले आरक्षण शाश्वत नसून, हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली काढण्यात आलेला शासन निर्णय (जीआर) ही सरकारकडून झालेली दिशाभूल असल्याचा एकमुखी सूर रविवारी (दि.१२) छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत उमटला. समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे शाश्वत आरक्षण मिळावे, यासाठी येत्या ९ ऑगस्टपासून क्रांती चौकात बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर ही मराठा क्रांती मोर्चाची जन्मभूमी असून, शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्याचा आदर्श जगासमोर याच शहराने ठेवला. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा रणशिंग फुंकले आहे. त्यानुसार आरक्षण लढ्याची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी सिडकोतील एन-३ परिसरातील एका शाळेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी मराठा समाजासमोरील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि संघटनात्मक प्रश्नांसह आरक्षणाच्या सद्यस्थितीवर सखोल चर्चा केली. आरक्षणासाठी केवळ आंदोलन पुरेसे नसून, कायदेशीर आणि संसदीय पातळीवर प्रभावी लढा उभारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच आरक्षणाबाबत समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी अभ्यासकांनी एकत्रित भूमिका मांडण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातील विविध प्रकरणांचा संदर्भ देत मराठा समाजाला शाश्वत आरक्षण देण्यासाठी केवळ राज्य सरकार नव्हे, तर संसदेत कायदा होणे आवश्यक असल्याचे मत काही वक्त्यांनी मांडले.
त्यामुळे आरक्षणाची मागणी केंद्र सरकारकडे प्रभावीपणे मांडण्याची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले. मराठवाड्याचा अनुशेष दूर करून येथील मराठा समाजाला न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आली. हैदराबाद गॅझेट, २ सप्टेंबरचा जीआर आणि ३० मेच्या एसओपीनुसार सर्वांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल, ही धारणा चुकीची असल्याचा एकमुखी सूर बैठकीत उमटला. वंशावळ आणि अधिकृत नोंदींशिवाय कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याने या विषयावर व्यापक जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
बैठकीस किशोर चव्हाण, डॉ. राजेंद्र दाते पाटील, डॉ. शिवानंद भानुसे, प्रा. रवींद्र बनसोड, प्रा. माणिकराव शिंदे, रवींद्र काळे, विजय काकडे, परमेश्वर नलावडे, डॉ. संजयराव तायडे पाटील, डॉ. संजय तांबे, पंढरीनाथ गोडसे, योगेश शेळके-धामोरीकर, नितीन देशमुख, प्रा. रवींद्र निळ, नितीन कदम, मच्छिंद्र देवकर, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रशांत इंगळे, शैलेश भिसे, बाबूराव चौधरी यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.