

कन्नड/ चिंचोली : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांची मोठी नासाडी झाली असून शेतकऱ्यांच्या हातात काहीच येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सरकारने सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ₹५०,००० (पन्नास हजार रुपये) आर्थिक मदत द्यावी, अन्यथा नुकसानभरपाईसाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नये, असे ठाम आवाहन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. चिंचोली लिंबाजी, टाकळी अंतूर आणि शेलगाव परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी ही मागणी सरकारकडे केली.
तालुक्यातील चिंचोली लिंबाजी व परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या असून, उभ्या पिके पूर्णतः पाण्याखाली आहेत.
शेतकऱ्यांचे हे दुःख कधीही भरून न निघणारे असून, सरकारने शेतकऱ्यांच्या संकटांची दखल घेत तत्काळ नुकसानभरपाई जाहीर करून, ती 'दिवाळी भेट' म्हणून द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी कन्नड तालुक्यातील दौऱ्यात चिंचोली लिंबाजी–घाटनांद्रा रस्त्यालगत असलेल्या प्रताप बाजीराव पवार यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी टाकळी अंतूर व शेलगाव येथेही भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
मनोज जरांगे पाटील हे या परिसरात प्रथमच आले होते. त्यामुळे नेवपूर, वाकी, बरकतपूर, वाकोद, दहिगाव येथे ग्रामस्थांनी त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. याप्रसंगी परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच तसेच विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांसह इतर समाजातील नागरिकांनीही त्यांच्याशी संवाद साधत सेल्फी घेतले.