

Jarange's relative killed in accident
पाटोदा, पुढारी वृत्तसेवा : पाटोदाकडून बीडकडे जाणाऱ्या कारने दासखेड फाटानजीक एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अतुल श्रीराम घरत (२३, रा. महाजनवाडी) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
महाजनवाडी येथील अतुल घरत है काही कामानिमित्त पाटोदा येथे गेले होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते गावी परत निघाले होते. त्यांची दुचाकी दासखेड फाट्याजवळ आली असताना भरधाव वेगातील कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
धडक दिल्यानंतरही कारचालकाने गाडी थांबवली नाही, यामुळे जवळपास दोनशे फुट अंतरापर्यंत घरत यांना फरपटत नेले. घरत यांना हेल्मेट असतांनाही जबर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले, परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.
घरत यांना ज्या गाडीने धडक दिली त्या गाडीमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा गणवेश सापडला. चालकाचे नाव लहू आंधळे असे असून, तो आंधळेवाडी येथील रहिवासी आहे. तो राज्य राखीव दलात कार्यरत असल्याची माहिती असून, तो पुणे येथून आपल्या गावी जात असताना ही घटना घडली.
अतुल श्रीराम घरत हा मराठा सेवक असून मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांत सक्रियपणे सहभागी असणारा कार्यकर्ता होता. आरक्षणाच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतलेला होता.