

Maintain quality in road works worth 213 crores in the taluka
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात दोन ठिकाणी मुख्य मार्गाचे काम सुरू आहे. पैकी वैजापूर-लाडगाव रस्त्याचे काम नियमानुसार होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रस्त्यावर खोदकाम कमी करण्यात येत असून, त्यात मुरूम न टाकता शेतातील काळी माती टाकण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हा महामार्ग वाहनचालक व प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या राष्ट्रीय महामार्गास मंजुरी देत सिमेंट रोडसाठी शासनाने २१३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. सदरील रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने मुरूम टाकून दबई करण्याऐवजी अनेक ठिकाणी काळ्या मातीचा वापर करत असल्याच्या तक्रारी होत आहे. त्यांमुळे रस्ता पूर्ण होण्याअगोदरच या रस्त्याच्या गुण-वत्तेचे पितळ उघडे पडले आहे.
वैजापूर तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात लाडगाव - वैजापूर हा २१ किमीचा तर शिऊर बंगला तलवाडा हा २० किमीचा महामार्ग निर्माण करून या ४१ किमी महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २१३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले आहे. शिऊर बंगला तलवाडा रस्त्यांवर दोन ते अडीच फूट खोदकाम केले आहे. त्यामध्ये मुरूम टाकून व्यवस्थित दवाई करण्यात येत आहे.
मात्र लाडगाव वैजापूर रस्ता सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचा करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधिताने केवळ साफसफाई करून रस्त्यावरील डांबराचा थर जेसीबीने बाजूला केला व त्या ठिकाणी केवळ पिवळ्या, काळ्या मातीचा भराव टाकला अशी ओरड नागरिकांतून होत आहे. पूर्वी जो डांबर रस्त्यावर होते. त्याच्या बाजूची जमीन ६ इंच उकरून माती बाजूला करून खड्ड्यात पिवळी माती टाकण्यात येत आहे. ही बाब शासकीय अधिकाऱ्यांना दिसत नाही काय, असा सवाल नागरिक करत आहेत.
प्रोजेक्ट मॅनेजर काय म्हणाले...
लाडगाव - वैजापूर या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाल्यानंतर रस्ता खोदून याठिकाणी मुरूम भरत दबई करावे अशी नियमावली आहे. परंतु अनेक ठिकाणी शेतातील काळ्या मातीचा वापर करून या रस्त्याची दबई होत असल्याचा आरोप होत आहे. याविषयी येथील कामावरील प्रोजेक्ट मॅनेजर महावीर संकलेचा यांना विचारले असता रस्त्याला तडे गेले किवा काही झाले तरी पाच वर्षांपर्यंत त्याचे मेंटेन्स आमच्याकडे असते त्यामुळे टेंशन घ्यायचे काम नाही, असे संकलेचा यांनी सांगितले.
माहितीचा फलक लावण्याची मागणी
येथील नागरिकांनी रस्त्यावर टाकण्यात येणारी काळी माती बघून विचारणा केली, परंतु सुपरवायझर उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुरू असलेल्या रस्त्याचे खोदकाम किती खोल आहे? त्यामध्ये कोणते साहित्य टाकले जाणार? मुरूम, गिट्टीचे थर किती इंचाचे व किती राहतील? वरचा थर कसा असेल? रस्त्यांची उंची किती असेल? या बाबतचा सविस्तर माहिती फलक काम करणाऱ्या कंपनीने मोबाईल नंबरसह लावावा, अशी मागणी होत आहे.