

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे महायुती करण्यासाठी आम्ही आग्रही होतो.
मात्र भाजपने आम्हाला शेवटपर्यंत खेळविले. त्यांच्या नेत्यांचा अहंकार आणि हट्टामुळेच युती तुटली असा आरोप शिवसेनेचे नेते व पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मंगळवारी केला. महापालिका निवडणुकीसाठी महायुती तुटल्याची घोषणा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मंगळवारी (दि.३०) केली. यावेळी बोलताना त्यांनी महायुती तुटण्यास भाजपच जबाबदार असल्याचे सांगितले.
शिरसाट म्हणाले, महायुतीसाठी स्थानिक पातळीवर आम्ही बैठका घेतल्या. स्थानिक कार्यकर्ते एका वेगळ्या भूमिकेत बघायला मिळाले. आम्हाला अगोदरच शंका आली होती. मी दरवेळेस स्थानिक नेत्यांना फोन करून बैठका केल्या. बावनकुळे यांच्याबरोबरही बैठक झाली. शेवटच्या संपर्कात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या समोर जागा वाटप ठरले. त्यावेळी युती झाली या संभ्रमात आम्ही होतो.
मात्र ज्यावेळी जागा द्यायची वेळ आली तेव्हा शिवसेनेच्या जागा सोडल्या जातील, असा प्रस्ताव दिला. आमचे कार्यकर्ते नाराज होतील, अशी त्यांची भूमिका होती. दुसरीकडे युतीच्या चर्चा सुरू असल्याचे सांगितले. या घडीलासुद्धा कोणताही नवीन प्रस्ताव त्यांनी दिला नाही. आग्रही भूमिकेला तडा दिला. आमची ताकद वाढली, आम्ही काहीही करू शकतो, असा त्यांना अहंकार होता. त्याचा अंत आज भाजप शिवसेना युती तोडल्याने झाला, असे शिरसाट म्हणाले.
आता जशास तसे वार केले जातील
आता महायुती तुटली आहे. या लढाईत जशाच्या तसे उत्तर दिले जाईल. आता छत्रपती संभाजीनगरात मैत्रीपूर्ण लढत नाही. थेट लढत होईल. भाजपने कुठे कट शिजविला आम्हाला माहिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर मला उघड बॉबलायला लावू नका. स्थानिक भाजप नेत्यांना सांगतो आवरा, ४ असा इशाराही मंत्री संजय शिरसाट यांनी दिला.