

Mahavitaran's latest security equipment for employees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वीज कर्मचारी हा महावितरणचा आधारस्तंभ आहे. तो सुरक्षित असेल तरच अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांच्या जीविताची सुरक्षा सर्वाधिक प्राधान्याचे आहे. तसेच त्यासाठी महावितरण कंपनी लवकरच अत्याधुनिक सुरक्षा साधने खरेदी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.
महावितरणच्या सांघिक कार्यालयातर्फे पुणे परिमंडल येथे १८ व १९ डिसेंबरला अत्याधुनिक सुरक्षा साधनांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी कंपनीत कार्यरत असलेल्या प्रमुख औद्योगिक संघटनांच्या शिखर पदाधिकारी, व्यवस्थापनातील वरिष्ठ अभियंते व अधिकारी यांच्यापुढे रास्तापेठ उपकेंद्रात तर दुसऱ्या दिवशी (दि.१९) पद्मावती येथील २२/११ केव्ही उपकेंद्रात परिमंडलातील अभियंते व वीज कर्मचाऱ्यांपुढे सुरक्षा साधनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे, ललित गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व वीज कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साधनांच्या सुरक्षा प्रात्यक्षिकासाठी तौरस पावरट्रॉनिक्स प्रा.लि. तर्फे अनुज अग्रवाल व त्यांच्या चमूने वीज पुरवठा सुरू असताना बिघाड शोधण्यासाठी लागणाऱ्या विविध आधुनिक साधनांसह, फोल्डिंग शिडी, बहुउद्देशीय रॉड आदींचे सादरीकरण केले. टाटा कंपनीने २२ केव्हीपर्यंतचा वीजरोधक गमबूट सादर केला. याशिवाय महावितरणमधील गणेश वडते व मुबारक पठाण यांनी स्वतः विकसित केलेल्या डिस्चार्ज रॉडचे प्रात्यक्षिक सादर केले.