Fraud Case : मेडिकल कॉलेजमध्ये पीजी प्रवेशाचे आमिष; व्यावसायिकाला घातला २० लाखांचा गंडा

बंगळुरूच्या भामट्यावर पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा
sambhajinagar fraud case news
Fraud Case : मेडिकल कॉलेजमध्ये पीजी प्रवेशाचे आमिष; व्यावसायिकाला घातला २० लाखांचा गंडाfile photo
Published on
Updated on

Lured with the Promise of PG Admission to Medical College; Businessman Swindled Out of ₹20 Lakhs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी बंगळुरू येथील नामांकित वैदेही महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाला तब्बल २० लाख रुपयांचा भामट्याने चुना लावला. हा प्रकार ३ नोव्हेंबर २०२५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान सिडको एन ४ भागात घडला. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात बंगळुरूच्या कन्सल्टन्सी चालकावर बुधवारी (दि.६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप कुमार (रा. हेब्बाल, बंगळुरू) असे आरोपीचे नाव आहे.

sambhajinagar fraud case news
लोक आदर्श पतसंस्थेत 6 कोटींचा घोटाळा; अध्यक्ष पठाणसह 11 जणांवर गुन्हा दाखल

फिर्यादी रमाकांत श्रीहरी वडजे यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी साक्षीला २५ ऑक्टोबर २०२५ रोजी संदीप कुमार याने फोन करून बंगळुरू येथील वैदेही महाविद्यालयात पीजी डर्मेटोलॉजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवले. तिने आई वडिलांना ही बाब सांगितली. वैदेही कॉलेज नावाज लेले असल्याने वडजे यांनी संदीपला कॉल करून आम्हाला प्रवेश घ्यायचा आहे असे सांगितले.

त्यानुसार २८ ऑक्टोबर रोजी वडजे कुटुंबीयांनी बंगळुरू गाठले. प्रथम त्यांनी कॉलेज बघितले. साक्षीला कॉलेज आवडल्याने तिथे प्रवेशाबाबत चौकशी करत असतानाच संदीपने कॉल करून त्यांना त्याच्या श्री साई कन्सल्टन्सीच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्याने माहितीपत्रक दाखवून के.ई.ए. मार्फत कॉलेजमध्ये जागा उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले. प्रवेशासाठी प्रतिवर्ष ५५ लाख रुपये फी लागेल आणि अनामत रक्कम म्हणून २० लाख रुपये आधी भरावे लागतील, बाकी कॉलेज फी, कॉलेज फंड वेगळा राहील, असे सांगितले. तेथून वडजे कुटुंब घरी परतले. त्यानंतर संदीपने कॉल करून बँक खाते क्रमांक दिला.

उडवाउडवीची उत्तरे, फोन घेणे बंद

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वडजे यांनी संदीपकडे पैशांचा तगादा लावला. त्याने २८ मार्चपर्यंत पैसे परत करतो असे सांगितले. मात्र त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत फोन उचलणे बंद केले. अखेर वडजे यांनी बुधवारी (दि.६) पुंडलिक नगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार गजानन मान्टे करत आहेत.

sambhajinagar fraud case news
५ लाखांच्या कर्जासाठी ३२ लाखांची वसुली

मोंढा नाक्यावर दिले १० लाख रोख

वडजे यांनी ३ नोव्हेंबर २०२५ रोजी संदीपच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यावर ५ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मोंढा नाका येथे संदीप कुमारने पाठवलेल्या एका अनोळखी व्यक्तीकडे १० लाख रुपये रोख स्वरूपात दिले. त्याच दिवशी पुन्हा बँकेतून ५ लाख रुपये संदीप कुमारच्या खात्यावर पाठवले. अशा प्रकारे एकूण २० लाख रुपये दिले.

तिसऱ्या फेरीनंतर बिंग फुटले

प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत मुलीचा नंबर लागला नाही. संदीपने तिसऱ्या फेरीत प्रवेश होईल असे सांगून वेळ मारून नेली. मात्र २६ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या फेरीतही प्रवेश न मिळाल्याने वडजे कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी थेट वैदेही महाविद्यालयात चौकशी केली असता, सर्व जागा भरल्याचे त्यांना सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news