

Recovery of ₹32 Lakhs for a ₹5 Lakh Loan
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बांधकाम व्यवसायासाठी घेतलेल्या 4 अवघ्या लाख रुपयांच्या कर्जापोटी एका तरुण सिव्हिल इंजिनीअरला व्याजाच्या विळख्यात ओढून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुद्दल आणि व्याजासह तब्बल ३१.५० लाख रुपये परत करूनही सावकाराचे समाधान झाले नाही. त्याने या तरुणाचे अपहरण करून, कुटुंबाला संपवण्याची धमकी देत त्याची अडीच एकर जमीनही बळकावली.
याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लखन राजू साबळे (३३, रा. ब्रिजवाडी) आणि विकी देविदास शिंदे (३३, रा. ब्रिजवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. व्यंकटेश राजू ढगे आणि प्रशांत बंडू ढाकणे हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
१६ लाख दिले, तरीही व्याजाचा ससेमिरा कायम !
फिर्यादी विश्वजीत संजय देशमुख (२९, रा. एन-४, सिडको) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. २०२४ मध्ये व्यवसायासाठी पैशाची गरज असताना त्यांनी लखन साबळेकडून ५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. या बदल्यात लखनने त्यांच्याकडून कोरे चेक आणि दोन कोऱ्या बाँडवर स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. काही महिन्यांतच लखनने ५ लाखांवर अव्वाच्या सव्वा व्याज लावून १६ लाखांची मागणी केली. विश्वजीत यांनी वेळोवेळी १६ लाख रुपये दिले, तरीही तुझे आणखी साडेसोळा लाख रुपये बाकी आहेत, असे सांगून आरोपीने धमकावणे सुरूच ठेवले.
सासू-सासऱ्यांनी दागिने मोडून दिले पैसे
मुलाची सुटका करण्यासाठी विश्वजीत यांच्या सासू प्रतिभा देशमुख यांनी मार्च २०२५ मध्ये साडेपंधरा लाख रुपयांचे दोन चेक आरोपींना दिले. अशा प्रकारे ५ लाखांच्या बदल्यात आतापर्यंत ३१ लाख ५० हजार रुपये आरोपींना मिळाले. तरीही जमीन परत करण्यासाठी आरोपींनी पुन्हा २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून अखेर देशमुख कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. प्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक शिवप्रसाद कहऱ्हाळे करत आहेत.
अपहरण करून जमिनीची जबरदस्तीने रजिस्ट्री
५ डिसेंबर २०२४ रोजी आरोपींनी विश्वजीत यांचे अपहरण करून त्यांना कन्नड येथे नेले. पैसे नसतील तर जमीन व्यंकटेश ढगेच्या नावावर करून दे, असा तगादा लावत त्यांना एमआयडीसी चिकलठाणा भागात नेऊन चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. कुटुंबाच्या जीवाच्या भीतीने विश्वजीत यांनी करंजखेड येथील आपली अडीच एकर जमीन व्यंकटेशच्या नावावर करून दिली.