

कन्नड (छत्रपती संभाजीनगर ) : तालुक्यात गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत बिबट्या तसेच इतर वन्यप्राण्यांचा वावर लक्षणीयरीत्या वाढल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिल २०२५ पासून आजपर्यंतच्या कालावधीत तालुक्यातील हतनूर, चापानेर, टापरगाव, चिखलठाण, औराळा, जेहर, अंधानेर, नागद आदी गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वारंवार घडल्या आहेत.
या कालावधीत बिबट्याने शेळी, गाय, वासरू यांसह एकूण १११ पशुधनाची शिकार केल्याची नोंद वनविभागाकडे आहे. या हल्लयांमुळे पशुधन मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाच्या नियमानुसार वनविभागामार्फत संबंधित लाभार्थीना ११ लाख २२ हजार ५४५ रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात आली आहे. अनेक बाधित शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याचे समोर आले आहे. हरीण व रानडुक्कर या वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मका, कापूस तसेच विविध भाजीपाला पिकांवर वन्यप्राण्यांनी धुडगूस घातल्याने उत्पादन घटले आहे. या संदर्भात गेल्या नऊ महिन्यांत २४४ नुकसान प्रकरणे दाखल करण्यात आली असून, त्यासाठी शासनाकडून ७ लाख ५८ हजार ७१३ रुपये इतकी मदत मंजूर व वितरित करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
तातडीच्या उपाययोजना गरजेच्या
वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असली, तरी मानवी वसाहतीलगत वाढणारा वन्यप्राण्यांचा वावर हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवित, पशुधन तसेच शेतीपिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर बिबट्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवणे, पिंजरे लावणे, रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळण्यासाठी प्रक्रिया सुलभ करणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरीवर्गातून होत आहे. अन्यथा भविष्यात मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
66 तालुक्यात १ एप्रिल २०२५ पासून आजपर्यंत बिबट्या हल्लयात १११ पशुधनावरील हल्ले प्रकरण तसेच रान डुक्कर, हरीण आदी वन्यप्राण्याकडून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झालेल्या २४४ प्रकरण दाखल झाले होते. या सर्व बाधित लाभार्थीना वनविभागाच्या नियमानुसार नुकसान भरपाई आर्थिक वर्षात देण्यात आली आहे.
शिवाजी टोम्पे, वनपरीक्षेत्र अधिकारी, कन्नड
सतर्क राहण्याची वेळ तालुक्यात सध्या बिबट्या असलेल्या परिसरातील ऊसतोडणी सुरू असल्याने बिबट्याला लपून राहण्यासाठी असलेले उसाचे क्षेत्र उघड होत आहे. आता बिबटे अजून सैरभैर होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना वनविभागाच्या केलेल्या जनजागृती व मार्गदर्शन प्रमाणे सतर्क राहावे लागणार आहे.