

Leopard Scare in the Fields of Andhari Shivar
अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : अजिंठा परिसरातील अंधारी शिवारात शुक्रवारी (दि.१३) रात्री बिबट्यांच्या जोडीने शेळ्यांवर हल्ला करून चार शेळ्यांचा फडशा पाडला, तर आणखी चार शेळ्या उचलून नेल्याची घटना घडली. शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत काही शेतकऱ्यांच्या धाडसाने नर बिबट्याला जिवंत पकडण्यात यश आले. यावेळी शेतात असलेल्या मादी बिबट्याने चौघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रात्रभर तिच्या डरकाळ्यांचा आवाज घुमत असल्याने परिसरात मोठा थरार निर्माण झाला.
अजिंठा येथील एका शेतातील वाड्यात शुक्रवारी रात्री नर-मादी बिबट्यांच्या जोडीने चार शेळ्यांचा फडशा पाडला होता, तर चार शेळ्या उचलून नेण्यात आल्या. यात संबंधित शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेचा पंचनामा अजिंठा वन विभागाने केला होता. शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हेच बिबट्यांचे जोडपे पुन्हा त्या शेतात पुन्हा शेळ्यांच्या शिकारीसाठी आले होते. शेतात त्यावेळी काही जण शेतात काम करत होते. अचानक शेतातील वीस बाय चाळीस आकाराच्या दोन खोल्यांच्या बांधकामात एक बिबट्या शिरताना त्यांच्या नजरेस पडला. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ खोलीची कडी-कोंडी दोरीने घट्ट बांधून दुसरे टोक खुट्याला बांधले आणि नर बिबट्याला आत कोंडून ठेवले.
खुट्याला दोरी बांधताना बाहेर आणखी एक विवट्या फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाहेर असलेल्या मादी बिबट्याने चौघांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. ती सुमारे चाळीस ते पन्नास फुटांपर्यंत येऊन डरकाळ्या फोडत त्यांना घाबरु लागली. मात्र हातात लाठ्या असल्यामुळे चौघांनी धैर्य दाखवत तिला हुसकावून लावले. काही वेळ ती वारंवार अंगावर येण्याचा प्रयत्न करत होती; परंतु चौघे जण असल्याने अखेर ती माघार घेत शेतातजाऊन लपून बसली. रातभर शेतातून तिच्या डरकाळ्यांचा आवाज घुमत होता.
शेतमजुरांनी तातडीने शेतमालकाला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. शेतमालकासह २५ ते ३० शेतकरी तेथे धावून आले आणि त्यांनी अजिंठा वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्यासह वनपाल दीपक सोनार, वनरक्षक शेख मोईनुद्दीन, अशोक दांडगे, शरद चेके, समाधान मोरे, योगेश शिंदे, योगेश साळवे तसेच वनमजूर राजू झोंड, भास्कर शहाणे, शिवाजी मुळे, मुकेश गुप्ता, सचिन झोड आदी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थ आरीफ खान मेवाती, फकिरा पठाण मेवाती, सादिक खान मेवाती, आदिल खान मेवाती, सलीम खान मेवाती, शकील खान मेवाती, उमर खान मेवाती यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
नैसर्गिक अधिवासात सोडणार
पशुवैद्यकीय अधिकारी शाम चव्हाण यांच्या तपासणीनंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर बिबट्याला अजिंठा हद्द सोडून इतर वन विभागातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांनी सांगितले आहे.
बिबट्या पिंजऱ्यात अडकला
रात्री अडीच वाजता पिंजरा आणून खोलीत कॉडलेल्या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. शेतात फटाके फोडण्यात आले. जवळपास तीन ते चार तास बिबट्या कधी पुढील खोलीत तर कधी मागील खोलीत धावत वन पथकाला हुलकावणी देत होता. अखेर सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास मोठ्या प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि वन विभाग व शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले. पिंजरा ट्रॅक्टरमध्ये ठेवून बिबट्याला अजिंठा वन विभागाच्या कार्यालयातील प्रांगणात आणले.