

Leopard Capture Nadarpur
पिशोर : कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवारातील काही शेतकऱ्यांना जंगल परिसरात बिबट्या फिरताना दिसल्याची माहिती समोर आली होती. अखेर २२ फेब्रुवारी रोजी शेतकरी दादाराव दत्तू निकम यांच्या शेतातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या स्पष्टपणे कैद झाल्यानंतर वनविभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
नादरपूर शिवारातील गट क्रमांक १६९ मध्ये दादाराव निकम यांच्या गायगोठ्यालगत २३ फेब्रुवारी रोजी वनविभागाने पिंजरा लावला होता. सुमारे पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गोठ्याजवळ काहीतरी हालचाल व आवाज झाल्याचे निकम यांना जाणवले. त्यांच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असल्याने त्यांनी तत्काळ फुटेज तपासले असता बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे स्पष्ट दिसून आले.
घटनेनंतर निकम यांनी तातडीने पिंजऱ्याजवळ जाऊन सुरक्षिततेची खात्री करून कोंडे व्यवस्थित बसवले. पहाटे ३.२० वाजता त्यांनी सिल्लोड येथील वनक्षेत्रपाल यशपाल दिलपाक यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत अधिकारी वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर मा. प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक मा. सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक स्वप्नील भामरे, वनक्षेत्रपाल सिल्लोड यशपाल दिलपाक, वनपाल आर. एम. शेख तसेच वनरक्षक अनिल इंगळे, कल्याण खोकड, अजीम शेख, विशाल जाधव, अशोक भिवसने व आरेफ सय्यद यांनी तात्काळ घटनास्थळी हजेरी लावली.
वनअधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सकाळी साडेसातच्या सुमारास पिंजऱ्यातील बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करून बिबट्याला अज्ञात सुरक्षित वनक्षेत्रात सोडण्यात आले.
या घटनेमुळे नादरपूर परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला असून वनविभागाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जंगल परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.