उमेश काळे
केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर येथील भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातून राज्यपाल म्हणून गेलेल्या बहुतांश नेत्यांना राजस्थानातच पाठविण्यात आल्याची नोंद असल्याने राज्यातील नेत्यांना आवडे राजस्थान असे म्हणावे लागेल.
मागील तीस पस्तिस वर्षाचा विचार करता माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना राजस्थानात पाठविण्यात आले होते. मुख्यमंत्रीपदावर असताना प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रभाराव यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपला सल्ला न घेता नियुक्ती झाल्याने संतप्त झालेल्या वसंतदादांनी मुख्यमंत्रीपद सोडले. परंतू दादांसारखा नेता घरी बसणे योग्य वाटत नसल्याने तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांची नियुक्ती राजस्थानच्या राज्यपालपदावर केली. १९८५ ते ८७ या काळात ते या पदावर होते. परंतु राज्यपाल म्हणून काम करताना येत आसणा-या राजशिष्टाचाराच्या मर्यादांमुळे हा लोकनेता राज्यपालपदी फार रमला नाही.दोन वर्षानंतर त्यांनी मानाचे पद सोडून परत महाराष्ट्रात जाणे पसंत केले.
उल्लेखनीय म्हणजे वसंतदादा यांच्याशी राजकीय वैर आसणा-या प्रभा राव यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्याचवेळी राजस्थानचे राज्यपालपद रिक्त झाल्याने प्रभा राव यांना राजस्थानचा कार्यभार देण्यात आला. डिसेंबर २००९ मध्ये त्यांनी राजस्थानची सूत्रे स्विकारली. जोधपूर हाऊस येथील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेथेच उपचार सुरु असताना २६ एप्रिल २०१० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंजाबाचे राज्यपाल आणि लातूरचे शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडे राजस्थानचा आतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला. २६ एप्रिल २०१० ते २०१२ पर्यंत चाकूरकर राजस्थानात होते. असाच अतिरिक्त पदभार सांभाळण्याची संधी उ. प्र. चे राज्यपाल राम नाईक यांना मार्गारेट अल्वा कार्यमुक्त झाल्यानंतर ८ आॕगस्ट २०१४ ते ३ सप्टेंबर २०१४ या काळात मिळाली. कल्याणसिंह यांची नंतर राजस्थानात नियुक्ती झाली.
काँग्रेसमधील शालिन नेत्या अशी ओळख आसणा-या प्रतिभाताई पाटील या २००४ ते २००७ या काळात राजस्थान राज्यपालपदी कार्यरत होत्या. राजस्थात असतानाच त्यांची राष्ट्रपतीपदावर वर्णी लागली. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती अशी नोंद त्यांची इतिहासात आहे. पदाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर प्रतिभाताई या सध्या पुण्यात स्थायिक झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील राम कापसे (अंदमान निकोबार), श्रीनिवास पाटील (सिक्कीम), सुशिलकुमार शिंदे (आंध्र) या नेत्यांना राज्यपाल होण्याची संधी मिळाली. पण बहुतेक जत पिंक सिटीच्या प्रेमात पडले हे मात्र खरे.