

Late pace in nominations! Candidates rush in the last three days
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजून पाच दिवस उलटले तरी गंगापूरमध्ये एकाही उमेदवाराने अर्ज भरला नव्हता. अखेर शनिवारी अध्यक्षपदासाठी दोन उमेदवाराचे ३ अर्ज तर नगरसेवक पदासाठी वेगवेगळ्या प्रभागातून तब्बल २३ उमेदवारी अर्ज दाखल होताच नामांकन प्रक्रियेला वेग आला. मात्र, आता उमेदवारांच्या हाती केवळ दोनच दिवस उरले असून १७ नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
रविवार सुटीच्या दिवशीही अर्ज भरण्यासाठी कार्यालय उघडे राहणार आहे. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याकारणाने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ङ्गपोळा फुटणार आहे. पक्षीय व अपक्ष संभाव्य उमेदवारांनी मागील काही दिवसांपासून अर्ज भरून घेतले, मुलाखती झाल्या; पण प्रमुख पक्षांकडून अधिकृत नावे जाहीर न झाल्याने सर्वच गटांत संभ्रमाचे वातावरण आहे. महायुती व महाविकास आघाडीचे गणितही अजून जुळत नसल्याने स्वबळावर लढाईची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
गंगापूर नगरपालिका निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून सुरुवात झालेल्या नामांकन प्रक्रियेत एकाही पक्षाने अर्ज दाखल केला नव्हता. शनिवार दि. १५ रोजी अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संजय जाधव, व शेख सोफीयान सिराज त्यांनी अपक्ष व एमआयएम पक्षाकडून नामांकन दाखल केले व नगरसेवक पदासाठी वेगवेगळ्या प्रभागातून २४ नामांकन पत्र दाखल झाले आहे. आता १६ व १७ नोव्हेंबर हे दोन दिवसच उमेदवारीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
कागदपत्रांची जमवाजमव करताना इच्छुकांची दमछाक
१६ नोव्हेंबर रोजी सुटीच्या दिवशीही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. परिणामी, रविवारी सोमवार या दोन दिवस दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याचा तगडा ताण उमेदवारांवर येणार आहे. १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर एकही अर्ज दाखल केला गेला नाही. अशा शांततेनंतर १५ नोव्हेंबर रोजी अचानक २६ अर्ज दाखल झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वागवाड व सहायक अधिकारी संतोष आगळे यांनी याची माहिती दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या कागदपत्रांची जमवाजमव करताना सर्वच पक्षांतील इच्छुकांची दमछाक होत असल्यानेही अर्ज प्रक्रियेत विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.