

पैठण : तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीदरम्यान विविध शासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे सांगण्यात येत असले तरीही यामध्ये मात्र दारूबंदी विभागाचे अधिकारी-कर्मचारी झोपेचे सोंग घेत असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे.
तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती कागदपत्रे शासकीय यंत्रणाकडून देण्यात येत असली तरीही प्रत्यक्ष मात्र तालुक्याचे चित्र अवैधरीत्या दारू विक्रीमुळे विचित्र झाल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. निवडणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक निवडणूक विभागाकडून संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचार्यांसह इतर कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आलेली आहे.
या बैठकीत कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीदरम्यान गालबोट लागू नये यासाठी अवैधरीत्या दारू विक्री प्रतिबंध करण्यात येऊन निवडणूक काळात इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या दारूच्या वाहतुकीचा उपाययोजना करून कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या असतानाही तालुक्यातील विहामांडवा, बिडकीन, लोहगाव, पाचोड, नवगाव, जायकवाडी, पिंपळवाडी, आडुळ, बालानगर, आपेगाव, वडवळी, तुळजापूर, हिरडपुरी, पाटेगाव, दावरवाडी, कातपूर, चितेगाव आदी गावांमध्ये अवैधरीत्या राजरोसपणे दारू विक्री सुरू आहे.
गंगापुरात बेकायदा देशी दारूची विक्री करणाऱ्यावर छापा
गंगापूर शहर परिसरात विनापरवाना आणि बेकायदा देशी दारूची विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी मंगळवारी (दि.3) सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 4,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीला ताब्यात घेतले आहे.गंगापूर पोलिस ठाण्यातील पोना. गणेश जाधव आणि पोकॉ. नारायण दुल्हत त्यांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई केली.पोलिसांनी दोन पंचासह सखारामपंत नगर भागात धाड टाकली. यावेळी संशयित आरोपी सागर आनंद तुपे (28, रा. लहाण्याचीवाडी, ता. फुलंबी, हल्ली मुक्काम सखारामपंत नगर, गंगापूर) हा एका पांढऱ्या रंगाच्या गोणीसह पोलिसांना मिळून आला.