

Brutal murder of a young man by a gang on a busy street
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वर्चस्ववादातून टोळक्याने चाकूहल्ल्याचा बदला घेण्यासाठी तरुणावर भररस्त्यात तलवारीने हल्ला केला. गळा, मान, हात, पाय, डोक्यात सपासप वार करून निघृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास शहाबाजार, सिटीझन हॉस्पिटलसमोर घडली. समीर खान इनायत खान (३०, रा. काचीवाडा, शहाबाजार) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, हत्येनंतर पसार झालेले आरोपी शोएब अन्वर खान (२१), इसरार खान निसार खान (२३, दोघे रा. राहत कॉलनी, पंचायत समितीमागे), मोहम्मद नासेर मोहम्मद फारुख ऊर्फ इंता (३२, रा. रशीदपुरा) आणि इस्लाम खान खमर खान ऊर्फ असलम चाऊस (२७, रा. शहागंज भाजी मंडई) यांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
पाचवा आरोपी आसिफ रायडर हा फरार आहे. तीन दिवसांपूर्वी शोएबवर चाकूहल्ल्याप्रकरणी समीर खानसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल होता. या घटनेनंतरच बदला घेण्यासाठी ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
फिर्यादी मृत समीरची पत्नी सना कौसर समीर खान (२५) यांच्या तक्रारीनुसार, तिचा पती समीर खान हा भाजीविक्रीचा व्यवसाय करत होता. त्यांना तीन मुली आहेत. मंगळवारी (दि. २८) रात्री शोएबने समीर, शाहरुख याच्याविरुद्ध शस्त्राने मारल्याचा सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बुधवारी सना या समीर सोबत ठाण्यात तक्रार दिली.
त्यात सोमवारी (दि.२७) आरोपी असिफ, हाफिज ऊर्फ टकला, शोएब काला यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदविली होती. त्यावरून आसिफ रायडरने समीरला फोन करून तुझे किसी के हाथ से मार दूंगा, तेरा मर्डर करूंगा, अशी धमकी दिली होती. समीरच्या हत्येप्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास एपीआय मनोज शिंदे करत आहेत.