

छत्रपती संभाजीनगर : एका निवृत्त पोलिस निरीक्षकाला एजंटसह तिघांनी जमिनी विक्रीचे आमिष दाखवून साडेपाच रुपये उकळले. इसारपावती करून दिली मात्र रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ करून गंडा घातला. हा प्रकार १७ ते २४ डिसेंबरदरम्यान हायकोर्ट येथे घडला. समीर मुसीर शेख, बाबासाहेब लक्ष्मण कुशर (दोघे रा. कन्नड) आणि शरद गोविंद जाधव अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी गुलाम मुर्तुजा खान (८०, रा. नवाबपुरा) यांच्या तक्रारीनुसार, ते निवृत्त पोलिस निरीक्षक असून, त्यांच्याकडे आरोपी समीर आणि कुशर हे १७ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या घरी आले. पलसगाव, खुलताबाद येथील गट क्र. १६३ मधील शेतजमीन ३. ९० हेक्टर दाखवली. जमीन दाखवताना मालक म्हणून शरद जाधव तिथे नव्हता, त्यांच्यावतीने दोघांनीच ४० लाखांमध्ये सौदा केला. एजंट मालकाकडून घेऊन अधिक किमतीत विकतात, असा समज करून खान यांनी लगेच टोकन म्हणून २१ हजार आरोपींना दिले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा २९ हजार दिले.
२० डिसेंबर २०२४ रोजी आरोपी जाधवला स्कार्पिओने घेऊन आले. खान यांना हायकोर्ट येथे बोलावून घेतले. तिथे आरोपी जाधव हा शेतजमिनीच्या मालकांपैकी एक कर्ता असल्याचे सांगितले. त्यावरून नोटरी करण्यासाठी भारसवाडकर यांच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे नोटरी तयार करून जाधवला त्यांनी ५ लाखांचा एसबीआय, खडकेश्वर शाखेचा धनादेश दिला. पूर्ण इसरपावती साडेपाच लाखांची होती. जर २० जा-नेवारी २०२५ पर्यंत व्यवहार पूर्ण झाला नाही तर पैसे परत करण्यात येतील, असे त्यात नमूद होते. त्यानंतर खान यांनी वारंवार एजंटला फोन करून रजिस्ट्री वेळेत करून देण्याची मागणी केली. मात्र त्यांनी आज, उद्या असे करत टाळाटाळ सुरू केली. काही महिन्यांनी आरोपींनी त्यांचा नंबर ब्लॉक केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खान यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.