

छत्रपती संभाजीनगर: शुभम चव्हाण
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील सुमारे २६ लाख संशयित लाभार्थीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता संभाजीनगर जिल्ह्यात १ लाख ४ हजार लाभार्थीच्या अर्जाची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे.
या तपासणीत, एकाच घरातून तीन किंवा अधिक लाभार्थी असलेल्या ८४ हजार प्रकरणांसह, २१ वर्षांखालील वयाच्या २० हजार बहिणींचाही समावेश आहे. इतर बहिणींना चिंता करण्याची गरज नाही. सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल १० लाख १५ हजार ८३४ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ९ लाख २४ हजार ३४८ अर्जदार पात्र ठरले आहेत. दरम्यान आता पडताळणी करण्यात येणाऱ्या १ लाख ४ हजार महिलांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वितरित करण्यात आलेला हप्ता मिळाला की नाही? याबाबत जिल्हा प्रशासनाकडे माहिती अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही.
जिल्हा पातळीवरील महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पात्र-अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थीच्या वयोमर्यादा, निर्गम उतारा, टीसी व अन्य कागदपत्रांची काटेकोर तपासणी करतील. जर घरातील तीन महिला अर्जदार असतील, तर फक्त दोन महिलांना पात्र ठरवून तिसऱ्याला अपात्र घोषित केले जाईल.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रोज ५ ते १० अशा जवळपास ४३५ महिलांनी आम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ नको असे अर्ज सादर केले आहे. त्या अर्जाची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. यावर शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पडताळणी दरम्यान, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास, घरातील दोन महिलांना पात्र ठरवण्याचा निर्णय कुटुंबप्रमुखांकडे देण्यात आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी सांगितले. मात्र, यामुळे काही कुटुंबांतून वादविवाद निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याच्याही चर्चांना उधाण आले आहे.
आम्हाला पडताळणीसंदर्भात विभागीय स्तरावरून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आम्ही तालुकास्तरावर आदेश दिले आहेत. लवकरच पात्र-अपात्र याद्या आमच्याकडे येतील. त्या आम्ही शासनाला पाठवणार आहोत.
गणेश पुंगळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर