भाषेचा घोळ झाला अन् मजुराला जमावाने चोपला

भाषेचा घोळ झाला अन् मजुराला जमावाने चोपला
Chhatrapati Sambhajinagar news
भाषेचा घोळ झाला अन् मजुराला जमावाने चोपलाfile photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माणसाच्या आयुष्यात संवादासाठी संबंधित प्रांतातील भाषा येणे गरजेचे असते ही बाब एका मजुराला चांगलीच समजली असावी. एका इतर भाषिक मजुराने शाळकरी मुलाला काही तरी विचारण्याचा प्रयत्न केला. त्याची भाषा न कळल्याने मुलाने घाबरून वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यावर हा अपहरण करणाऱ्या टोळीतील असावा, असा संशय आल्याने जमावाने सदर मजुरास बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार सोमवारी (दि.२१) दुपारी बारा वाजेच्या सुमारास जुन्या मोंढ्यातील हरी मशिदीजवळ घडला.

शाळा सुटल्यानंतर एक मुलगा घरी परताना घडली घटना

अधिक माहितीनुसार, जिन्सी परिसरातील एका शाळेत इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा शाळा सुटल्यानंतर घरी परतत होता. त्यावेळी त्याच्या समोरून एक व्यक्ती जात होती. त्याने अचानक त्याचा हात पकडला व काही तरी बोलला. त्याची भाषा वेगळी व मुलाने कधीही ऐकलेली नसल्याने तो प्रचंड घाबरला. त्याने मजुराच्या तावडीतून आपला हात सोडवत त्या ठिकाणाहून पळ काढला.

अपहरण करणाऱ्या टोळीचा अंदाज

काही अंतरावरच एका दुकानात त्याचे वडील बसलेले होते. त्याने त्याठिकाणीच त्यांना सर्व प्रकार सांगितला. सदर दुकानात इतर काही मंडळी असल्याने ती घटना अपहरण करणाऱ्या टोळीची असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर काही जणांचा समूहच सदर जागेवर गेला. त्यावेळी काही विचारण्याआधीच जमावाने त्यास मारहाण सुरू केली. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या मित्राने त्याठिकाणाहून पळ काढला. तर मजुराला जिन्सी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

त्यात पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो मोंढा नाका परिसराचा पत्ता विचारत होता. तो मजूर मद्यधुंद अवस्थेत असल्याने मुलगा अधिक घाबरला आणि सर्व गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे हा केवळ भाषेच्या गैरसमजामुळे झालेला प्रकार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मजूर व जमलेल्या जमावाची समजूत घालण्यात आल्याची माहिती जिन्सीचे निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली. याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंद करण्यात आला नाही.

आरसीबीनं सचिन बेबीला केलं खरेदी, पण लोकांनी समजलं सचिनचा अर्जुन! काय झाला नेमका घोळ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news