

Kidnapping of two daughters of women garbage pickers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुलांना खेळायला नारेगाव मनपा शाळेसमोर नेहमीप्रमाणे सोडून कचरा वेचण्यासाठी गेलेल्या दोन महिलांच्या १० व १२ वर्षीय दोन मुलींचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि.१) दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली.
फिर्यादी २५ वर्षीय मीना यांच्या तक्रारीनुसार, त्या पती व चार मुलांसह मिसारवाडी भागात राहतात. त्यांच्या घराशेजारी मैत्रीण भारती तिच्या १० वर्षीय मुलीसोबत राहते. दोघीही कचरा वेचण्याचे काम करतात. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मुलांसह दोघीही नेहमीप्रमाणे नारेगाव येथील मनपा शाळेसमोर आल्या.
तिथे मीना यांचा ९ वर्षे, ५ वर्षांचा मुलगा, १२ वर्षांची नंदिनी व भारतीची १० वर्षीय मुलगी राणी यांना खेळण्यासाठी सोडून कचरा वेचण्यासाठी दोघीही गेल्या. दुपारी साडेचार वाजता परत आल्या तेव्हा तिथे नंदिनी आणि राणी दोघीही नसल्याचे समोर आले. शोधाशोध केली, मात्र त्या मिळून आल्या नाही. दोघींचे अपहरण केल्याच्या संशयावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.