

Khultabad: Rains caused major damage to onion crops in many villages of the taluka
सुनील मरकड
खुलताबाद : तालुक्यातील अनेक गावांत पावसामुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातून काढून ठेवलेला कांदा भिजून सडत आहे. तर काही ठिकाणी बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने कंद खराब होत आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे. संकटात सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव सह परिसरात गतवर्षी कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. हजारो टन साठवलेला कांदा गेल्या दोन तीन महिन्यांपासून चाळीत पडून आहे. परंतु मेच्या सुरुवातीलाच झालेल्या बेमोसमी पावसाने शेतातच कांदा खराब झाला. कांद्याचे नुकसान, तर झालेच त्यातून उरलेला कांदा शेतकऱ्यांनी पुढे तरी बाजारभाव मिळेल, या आशेने आणखी खर्च करीत चाळीत साठवून ठेवला आहे.
कांद्याचे पैसे होतील व कुटुंबाचा उदर निर्वाह चांगल्या पद्धतीने होईल. बँका, पतसंस्था व दुकानदारांची आर्थिक देणी देता येतील, कर्ज मिटवता येईल, मुलांचे शिक्षण, आरोग्य, लग्नसोहळे, इतर खर्चाचे ताळमेळ बसतील या आशेवर यंदा जवळजवळ सत्तर टक्के शेतकऱ्यांनी कांदा साठविण्याचा निर्णय घेतला.
या खेपेस मात्र शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला. बदलते हवामान, पावसामुळे कांद्याला काजळी येऊन तो आता काही अंशी चाळीतच सडू लागला आहे. त्यामुळे गल्लेबोरगाव सह परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून कांद्याची साठवणूक केली आहे. परंतु बाजारभाव नसल्याने कांदा विकता येईना. प्रतिकूल हवामानामुळे कांदा आता सडू लागला आहे. त्यामुळे तो आता चाळीत ठेवताही येईना, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.