

11.5 lakhs looted by tampering with ATM
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून दोन भामट्यांनी तीन दिवसांत तब्बल ११ लाख ४६ हजार ५०० रुपये लंपास केले. त्यासाठी विविध बँकांचे १० ते १२ एटीएम कार्डचा वापर करण्यात आला. हा प्रकार १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान समर्थनगर येथील एसबीआय बँकेच्या शाखेतील एटीएममध्ये घडला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तुषार उद्धव जोगदंड (३२, रा. शाहूनगर बीड) हे एसबीआय बँकेच्या समर्थ नगर शाखेत प्रबंधक म्हणून नोकरीला आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी (दि. २३) रोजी दुपारी बँकेच्या अंतर्गत खात्याची पाहणी केल्यानंतर ११ लाख ४६ हजार ५०० रुपये बँकेतून कपात झाले मात्र, ही रक्कम खातेदाराच्या खात्यातून कपात झाली नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी चीफ मॅनेजर सुनील धामणगांवकर व एटीएम चॅनल मॅनेजर विकास निकाळजे यांना कळविले.
एटीएमचे सीसीटीव्ही फुटजे तपासले त्यात १६ ते १८ सप्टेंबर या तीन दिवसांत सकाळी ६ ते रात्री १२ या यावेळेत २२ ते २५ वयाचे दोघेजण एचडीएफसी, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ऍक्सिस बँक व इतर विविध बँकांचे डेबिट कार्ड वापरून वेगवेगळ्या वेळेत ८ ते १० हजाराच्या स्वरूपात एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून वेळोवेळी पैसे काढताना दिसून आले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक अशोक इंगोले करत आहेत.
तीन दिवसात भामट्यानी एसबीआय सोडून अन्य बँकांचे एटीएम कार्ड वापरून तब्ब्ल १८० ट्रॅन्जेक्शन करून साडे अकरा लाख लंपास केले. त्यामुळे आता संबंधित बँकांकडून पोलिसांनी आणि एसबीआय बँकेने त्या सर्व एटीएम कार्ड खात्यांची माहिती मागवली आहे.
साधारणतः चोरटे एटीएम मशीन फोडणे, मशीन पळविणे असे प्रकार करायचे. मात्र, चक्क एटीएम मशीनची दिशाभूल करून रक्कम हडपल्याचा हा या भागातील पहिलाच प्रकार आहे. संशियित दोन्ही आरोपी हे परप्रांतीय आणि एटीएमसंबंधित जाणकार असल्याचा पोलिसांना संशय आहे.
एटीएम कार्ड टाकल्यानंतर पैसे बाहेर पडणाऱ्या ठिकाणी बोट ठेऊन अचानक ते मशीन बंद करायचे. त्यामुळे मशीनला ग्राहकाचे पैसे आतच अडकल्याची माहिती जायची. मात्र, इकडे पैसे बाहेर यायचे. यात प्रत्येकवेळी बँकेच्या एटीएम मशीन खात्यातून रक्कम कपात झाली. पण ग्राहकाच्या खात्यातून पैसे कपात झाले नाही.