Hingoli News : कळमनुरी न.प., पं.स.सह पशुसंवर्धन कार्यालयांच्या जमिनीप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका

मूळ जमीन मालकांना मोबदला न मिळाल्याचा दावा; ॲड. हितेश सांगळे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल
Kalamnuri Land Dispute
Kalamnuri Land Disputepudhari photo
Published on: 
Updated on: 

कळमनुरी : कळमनुरी येथील सर्वे क्रमांक १८६ मधील जमिनीच्या मालकी व मोबदल्याच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. बहेरू महादू गुंजकर व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर अशा स्वरूपाच्या या प्रकरणात ॲड. एच. बी. सांगळे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली आहे.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून, मूळ जमीन मालकांना योग्य मोबदला मिळालेला नसल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या जमिनीवर पंचायत समिती, नगर परिषद तसेच पशुसंवर्धन विभागाशी संबंधित कार्यालये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Kalamnuri Land Dispute
Marathwada Graduate Election Result : चव्हाणांचा ‘स्वभाव’ हेच पाटलांच्या विजयाचे ‘सच’!

सदर जमीन प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत असून, सुमारे ६० वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या जमीन मालकांनी अखेर उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे याचिकाकर्त्यांच्या बाजूने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी या याचिकेवर सुनावणी घेतली. न्यायालयाने संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश देत ती ५ नोव्हेंबर २०२६ रोजी परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

Kalamnuri Land Dispute
Drought Relief | जिल्हा वार्षिक योजनेतील 10 टक्के पुनर्विनियोजन अट रद्द

प्रतिवादी क्रमांक १ ते ३ यांच्या वतीने उपस्थित एजीपीने नोटीसची सेवा स्वीकारली असून, खासगी प्रतिवादींना नियमानुसार नोटीस बजावण्यास परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे कळमनुरी परिसरातील नागरिक तसेच संबंधित जमीन मालकांचे लक्ष लागले असून, न्यायालयाच्या निर्णयानंतर या जमिनीवरील मालकी, मोबदला आणि शासकीय कार्यालयांच्या वापराबाबत पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news