Jigisha Natyasahavas: छत्रपती संभाजीनगरात रंगणार 'जिगीषा नाट्यसहवास'; यंदाचा 'मिलिंद सफई पुरस्कार' योगेश शिरसाठ यांना दिला जाणार

Jigisha Natyasahavas 2026: छत्रपती संभाजीनगर येथे २१ ते २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान 'जिगीषा नाट्यसहवास' या तीन दिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Jigisha Natyasahavas 2026
Jigisha Natyasahavas 2026Pudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिगीषा नाट्यसहवास’चे शुक्रवार दि. २१ ते रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. यावर्षीच्या नाट्यमहोत्सवाचे उ‌द्घाटन शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांच्या हस्ते एम. जी.एम. परिसरातील रुक्मिणी सभागृहात सायं. ६ वा. संपन्न होईल.

याप्रसंगी एम.जी.एम. विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम व फाउंडेशनचे विश्वस्त नंदकिशोर कागलीवाल यांची प्रमुख उपस्थिती असेल. उद्घाटन समारंभानंतर त्याच रंगमंचावर दि. २१ ऑगस्ट रोजी सायं. ७.३० वा. माधवी पुरंदरे (मूळ लेखिका कॅरन लिवाईन) अनुवादित आणि जयेश आपटे दिग्दर्शित 'हॅनाची सुटकेस' या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. यात साजिरी जोशी या कलावंत आहेत.

या नाट्यमहोत्सवात 'जिगीषा' तर्फे 'मिलिंद सफई पुरस्कार' सुरु करण्यात आला आहे. नोकरी, उपजिविका सांभाळून रंगभूमीवर सातत्याने काम करणाऱ्या रंगकर्मीची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. यावर्षी हा पुरस्कार महाराष्ट्राला मनमुराद हसवणारे आणि हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणारे हरहुन्नरी अभिनेते व लेखक योगेश शिरसाठ यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी याच परिसरात नाट्यविषयक पुस्तकांचे अभिनव पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. केवळ 'नाटक' या प्रकारातील नाट्यसंहिता, नाट्यसमीक्षा, नाट्यविषयक अभ्यासपूर्ण लेख, कलावंतांची आत्मचरित्र या प्रदर्शनात असतील. त्यात 'पॉप्युलर', 'राजहंस', 'मौज', 'मॅजेस्टिक' आणि इतर अनेक नामवंत प्रकाशन संस्थांची नाट्यविषयक ग्रंथसंपदा रसिक वाचकांना उपलब्ध असणार आहेत. मुख्य उद्घाटन सोहळ्यापूर्वी ज्येष्ठ लेखक व प्रकाशक बाबा भांड यांच्या हस्ते या 'पुस्तक प्रदर्शना'चे उद्घाटन संध्या. ५ वा. संपन्न होईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांची प्रकट मुलाखत आईन्स्टाईन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व प्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर हे त्यांची मुलाखत घेतील.

त्यानंतर दुपारी ४ वा. ‘साहित्य ते नाटक : माध्यम रुपांतर’ या विषयावरील परिसंवादाचे आईन्स्टाईन सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नाट्यलेखक व दिग्दर्शक अतुल पेठे, साहित्यिक बालाजी सुतार व आसाराम लोमटे सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता लेखक – दिग्दर्शक अपूर्वा कुलकर्णी व गिरीश दातार यांचे ‘सवाल-जवाब’ या नाटकाचा प्रयोग रुक्मिणी सभागृहात सादर होईल. नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे नाटक भाष्य करते.

महोत्सवाच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वा. प्रसिद्ध नाटककार प्रा. अजित दळवी यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन आईन्स्टाईन सभागृहात करण्यात आले आहे. मुस्तजीब खान व शिव कदम हे त्यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी ४ वाजता 'उमगलेले गांधी' या अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईच्या 'आविष्कार' संस्थेने दीपक राजाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात गांधीजींच्या विचार, कार्य आणि साहित्याचे अभिवाचन केले जाणार आहे.

ज्यामध्ये जागतिक पातळीवर कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, दीपक राजाध्यक्ष, चंद्रकांत कुलकर्णी आणि इतर गांधी विषयक निवडक लेखांचे अभिवाचन करणार आहेत.

आईन्स्टाईन सभागृह येथे सदरील अभिवाचन संपन्न होईल. त्यानंतर सायंकाळी ७ वा. सुनील डोंगर लिखित व दिग्दर्शित ‘बरड’ या नाट्य प्रयोगाने नाट्यमहोत्सवाचा समारोप होईल.

Jigisha Natyasahavas 2026
Awarapan 2 Trailer: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीचं जबरदस्त कमबॅक; 'आवारापन 2'चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

गेल्या बारा वर्षाहून अधिक काळ शहरात अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. गेल्या ४ वर्षांपासून आता 'जिगीषा नाट्यसहवास'मुळे त्याच सांस्कृतिक वातावरणात अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे.

Jigisha Natyasahavas 2026
Pranit More: '370 रुपये बिर्याणी' वादानंतर प्रणित मोरेचं जोरदार 'कमबॅक'; 'घायल' शोची घोषणा होताच सोशल मीडियावर पुन्हा राडा

या नाट्यमहोत्सवास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महोत्सवाचे आयोजक चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, नीलेश राऊत, दासू वैद्य, श्रीपाद पद्माकर, अभय जोशी, डॉ. रेखा शेळके, डॉ. प्रेरणा दळवी, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. अजय दंडे, डॉ. शिव कदम, सुबोध जाधव, श्रीकांत येरुळे आदींनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news