

सिल्लोड : बोलेरो जीपने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात पंचवीस वर्षीय तरुण जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी (दि. 1) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील केऱ्हाळा फाट्याजवळ घडला. या घटनेची वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अजय शिवाजी जोगदंडे (25, रा. निल्लोड, ता. सिल्लोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत तरुण व त्याचा मित्र दुचाकीवरुन क्र. (एमएच- 20, बीएक्स- 1911) केऱ्हाळाफाट्यावर आरोचे पाणी घेण्यासाठी आले होते. फाट्यावर वळण घेताना छत्रपती संभाजीनगरकडून सिल्लोडकडे जाणारी बोलेरो जीपने क्र. (एमएच- 12, एनई- 5598) दुचाकीला धडक दिली. यात पाठीमागे बसलेला तरुण अजय जोगदंडे जागीच ठार झाला.
अपघात होताच नागरिकांनी धाव घेत तरुणाला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले.मृत तरुणावर सोमवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐन होळी सणासुदीच्या दिवशी तरुणावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबासह नातेवाईकांवर आल्याने पंचक्रोशी हळहळली. तरुणाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
आठ दिवसांत दुसरी घटना
आठ दिवसात अपघात मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या सोमवारी (दि. 23) रात्री ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकल्याने निल्लोड येथील कैलास मगर व संजय खटाळ यांचा मृत्यू झाला होता. हे दोघेही एका हॉटेलवर कामाला होते. या अपघाताला आठ दिवस झाले नाही, तर पुन्हा हा अपघात घडला. आठवडाभरातील या दोन घटनेत निल्लोड येथील तिघांचा अपघाती मृत्यू झाला.
चार महिन्यांपूर्वीच झाले लग्न
मृत तरुण चिंचखेडा गावाजवळील एका हॉटेलवर कामाला होता. हॉटेल व गावाचे अंतर अवघे तीन किमी असल्याने येजा करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचे चार महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा अकाली मृत्यू झाला. तर घरातील कर्ताच गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.