

Jayakwadi Dam turns fifty years old
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील जायकवाडी धरणाचा सुवर्ण महोत्सव मंगळवारी (दि. २४) सायंकाळी धरणावर केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठवाड्यासाठी जलसिंचन व पिण्याच्या पाण्याची तहान भागविणारे जायकवाडी धरणाची उभारणी तत्कालीन मुख्यमंत्री पैठणचे भूमिपुत्र शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारली. धरणाची पायाभरणी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते १८ ऑक्टोबर १९६५ रोजी करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते राष्ट्राला २४ फेब्रुवारी १९७६ रोजी समर्पण करण्यात आले.
सहा जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होतो. औद्योगिक वसाहतीस २ हजार ६०० औद्योगिक कंपन्यांना पाण्याचा पुरवठा केला जातो. तर १२ मेगा वॅट विद्युत निर्मिती या प्रकल्पातून केली जाते. ५५० गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. पन्नास वर्षांच्या काळात धरण पंधरा वेळा शंभर टक्के भरले आहे. मराठवाड्यातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरलेला जायकवाडी धरणाचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना धरणावरील अधिकाऱ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले.
यावेळी निवृत मुख्य अभियंता ए. बी. जोगदंड, निवृत्त अधीक्षक व प्रशासक संजय भर्गोदेव, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपविभागीय अभियंता दीपक डोंगरे, उपकार्यकारी अभियंता कांजुणे, सारडा, उप अभियंता श्रध्दा निंबाळकर, शाखा अभियंता मंगेश शेलार, गणेश खराडकर, अपूर्वा सोनेकर, व्ही. वी. वाघ, रितेश भोजणे, संदीप कुरलिये, अंधारे, गाजी, पठाडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.