

Jarange's warning: Certificates will definitely be issued in accordance with the Hyderabad Gazette
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील प्रत्येक पात्र मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र मिळणारच आहे. मात्र सरकारकडून पुन्हा दगाफटका झाल्यास मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आपण पुन्हा मैदानात उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळत असून, सरकार या कामात मागे हटणार नाही, असा विश्वास मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून सकारात्मक हालचाली सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नोंदी आणि लोकसंख्येचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे शासनाने घेत लेल्या निर्णयानुसार पात्र व्यक्तींना कोणत्याही अडथळ्याविना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली पाहिजेत. प्रमाणपत्र वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या असून, त्यासाठी एसओपी तयार करण्यात आली आहे.
अनेक कुटुंबांमध्ये एका व्यक्तीला प्रमाणपत्र दिले जाते, तर त्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला ते नाकारले जाते. ही विसंगती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींकडे जुने पुरावे किंवा नोंदी उपलब्ध नाहीत, अशा पात्र मराठा बांधवांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सरकारने दिलेल्या शब्दांपैकी काही बाबी अद्याप प्रलंबित असल्या, तरी अलीकडील घडामोडींमुळे समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घ्यावा
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच समाजबांधवांनी आपल्यासमोरील अडचणी एकमेकांपर्यंत आणि आमच्यापर्यंत पोहोचवत राहाव्यात. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेली लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली असून, समाजाने आमच्यावर विश्वास ठेवावा, असेही ते म्हणाले.