

Impersonator IAS woman officer arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : खाडाखोड केलेल्या आधारकार्डचा वापर करून हॉटेल अॅम्बेसेडरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या तोतया आयएएस एका महिलेला सिडको पोलिसांच्या विशेष शाखेने शनिवारी (दि.२२) ताब्यात घेतले. या महिलेकडे भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) नियुक्तीपत्राची झेरॉक्स प्रत आढळून आल्याने तिने तोतया आयएएस अधिकारी बनून अनेकांची फसवणूक केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कल्पना त्र्यंबक भागवत (४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव) असे महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार सिडको पोलिस ठाण्याच्या विशेष शाखेचे हवालदार सतीश बोर्डे (४६) यांना मिळालेल्या माहितीनुसार एक महिला गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल अॅम्बेसिडरमध्ये संशयास्पदरीत्या राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या सूचनेनुसार हर्मूल ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार, सहाय्यक निरीक्षक अरुणा घुले, वर्षा काळे व पथक २२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता हॉटेल अॅम्बेसिडर येथे धडकले.
आधारकार्डवर खाडाखोड
हॉटेल व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता, कल्पना भागवत गेल्या सहा महिन्यांपासून एकाच रूममध्ये राहत असल्याचे समोर आले. तिच्या ओळखपुरावा म्हणून जमा केलेल्या आधारकार्डवर जन्म तारखेत खाडाखोड केल्याचे समोर आले. याबाबत त्या महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली.
आयएएस नियुक्तीपत्राची झेरॉक्स
संशय बळावल्याने पोलिसांनी रूमची झडती घेतली असता, तिच्या बॅगमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) नियुक्तीपत्राची झेरॉक्स आढळून आली. यात कल्पना भागवत नाव ३३३ क्रमांकावर असल्याचा उल्लेख होता. दरम्यान याबाबत अधिक माहिती देण्यास महिलेने टाळाटाळ केल्याने ती तोतया आयएएस अधिकारी बनून अनेकांनी फसवल्याचा संशय बळावला. तिच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तिला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने २६ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.