

पैठण : घरकुल योजनेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित वाळू काळाबाजाराविरोधात तसेच वाळू तस्करांना सहकार्य करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.8) पाटेगाव येथील गोदावरी नदीत चार तास जलसमाधी आंदोलन केले.
सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, पाटेगाव, चनकवाडी आणि हिरडपुरी येथील गोदावरी पात्रातून घरकुल योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असून, लाभार्थींना वाळू वाटपाच्या नावाखाली प्रत्यक्षात काळाबाजार सुरू आहे.
महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने दिवस-रात्र अवैध वाळू वाहतूक होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी नायब तहसीलदार राहुल बनसोडे, मंडळ अधिकारी कल्पना शेळके, तलाठी शितल झिरपे तसेच तहसीलदार ज्योती पवार यांच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
चार तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, नायब तहसीलदार राहुल बनसोडे आणि पोलिस उपनिरीक्षक संभाजी खाडे यांनी मध्यस्थी केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत तातडीने लेखी स्वरूपात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन दुपारी स्थगित करण्यात आले.
घरकुल लाभार्थींना वाळू वाटपावर प्रश्नचिन्ह
पैठण तहसील कार्यालयाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात घरकुल योजनेचे 15 हजार 296 लाभार्थी आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 131 लाभार्थींनाच वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाळू वाटपाच्या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
हिरडपुरीतील वाळू लिलावावरही आक्षेप
गोदावरीत आंदोलन सुरू असतानाच हिरडपुरी येथे गोदावरी पात्रातील सुमारे 5 हजार बास वाळूच्या लिलावाची प्रक्रिया सुरू होती. शासनाने वाळूचा दर प्रतिवास 600 रुपये निश्चित केलेला असताना हा लिलाव अवघ्या 120 रुपये प्रतिवास दराने ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.