

Inspection reports of three districts received, colleges in the district will be inspected from July 8-9
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आवश्यक शैक्षणिक व भौतिक सुविधा आणि गुण-वत्ता निकषांची तपासणी तीन जिल्ह्यांत ३० जूनपासून करण्यात आली. त्यांच्या तपासणीचा अहवाल विद्यापीठाला प्राप्त झाला असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांची तपासणी ८-९ जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती प्र कुलगुरु वाल्मिक सरवदे यांनी दिली.
विद्यापीठाच्या क्षेत्राधिकारातील जालना, बीड, धाराशिव या तीन जिल्ह्यांतील वरिष्ठ महाविद्यालयांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणी समित्यांना ५ जुलैपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. या अहवालातील वृत्तांत पाहून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. या समित्यांच्या अहवालाच्या आधारे संबंधित संस्थांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रदेश घेण्याची मंजुरी देण्यात येणार आहे.
अभ्यासक्रमनिहाय ११ प्रमुख शैक्षणिक व भौतिक सुविधा निकष विहित केले असून, यामध्ये प्राध्यापकांची संख्या, ग्रंथालयाची स्थिती, संगणक व प्रयोगशाळा सुविधा, वर्गखोल्यांची संख्या, अभ्यासक्रमातील सुसंगती, वसतिगृहे, शैक्षणिक गुणवत्ता आदी बाबींचा समावेश आहे.
विद्यापीठ प्रशासनानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील वरिष्ठ महाविद्यालयांच्या तपासणीसाठी २० ते २२ समित्यांची घोषणा केली आहे. या समित्या सुमारे १३१ महाविद्यालयांच्या तपासण्या करून अहवाल सादर करणार आहेत. तपासणी मोहीम ८-९ जुलैपासून करण्यात येणार असल्याची माहिती सरवदे यांनी दिली.