

Changes in traffic on the occasion of Bakri Eid
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण येत्या शनिवारी (दि.७) साजरा करण्यात येणार आहे. ईदनिमित्त छावणी ईदगाह, रोजेबाग ईदगाह येथील मैदानावर नमाज अदा करण्यासाठी शहरातील विविध भागांतून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. तसेच परिसरातील नागरिकही त्यांच्या शहरातील दैनंदिन कामकाजानिमित्त बाहेर पडतात. नागरिक व नमाज अदा करण्याकरिता येणाऱ्या भाविकांमुळे छावणी व रोजेबाग ईदगाह परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या काळात नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून या परिसरात वाहतूक व्यवस्थेत पुढील बदल करण्यात आला आहे.
शनिवारी पहाटे पाच ते सकाळी अकरा वाजेपर्यंत मिलिंद चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच रोजाबाग ईदगाहकरिता हडको कॉर्नर ते उध्दवराव पाटील चौकापर्यंत रोजाबाग ईदगाहकडील रोडची एक बाजू बंद करण्यात येणार आहे.
मिलिंद चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटकडे जाणारी व येणारी वाहने ही मिलकॉर्नर - भडकलगेट- टाऊन हॉल उड्डाणपुलाखा-लून मकाईगेट बेगमपुरा चौकमार्गे जातील व येतील. घाटी दवाखाना, पाणचक्कीमार्गे मिलिंद चौकाकडे येणारी वाहने घाटी दवाखाना, ज्युब्ली पार्क, मिलकॉर्नर, बारापुल्लागेट, मिलिंद चौक या पर्यायी मार्गाचा वापर करतील. घाटी दवाखाना, पाणचक्कीमार्गे विद्यापीठ गेट व बेगमपुराकडे जाणारी-येणारी वाहने घाटी दवाखाना, ज्युब्ली पार्क, टाऊन हॉल, मकाई गेट या पर्यायी मार्गाचा वापर करतील. तसेच उध्दवराव पाटील चौक ते हडको कॉर्नरकडे जाणाऱ्या रोडच्या शासकीय दवाखान्याकडील एका बाजूचा मार्ग सुरू राहाणार आहे.